प्रेमळ, तळमळीने सेवा करणारी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असणारी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक (वय ११ वर्षे)!

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. प्रार्थना महेश पाठक ही या पिढीतील एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

फाल्गुन कृष्ण पक्ष प्रतिपदा (१९.३.२०२२) या दिवशी पुणे येथील कु. प्रार्थना महेश पाठक हिचा ११ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये आणि तिच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

कु. प्रार्थना पाठक

कु. प्रार्थना पाठक हिला ११ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

सौ. राजश्री अरुण खोल्लम, पुणे

सौ. राजश्री खोल्लम

१. प्रेमभाव

माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सौ. मनीषाताईने (प्रार्थनाची आई सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी)) मला शुभेच्छा देण्यासाठी भ्रमणभाष केला होता. तेव्हा तिने मला सांगितले, ‘‘प्रार्थनालाही तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत.’’ तेव्हा आधी ‘भावपूर्ण नमस्कार !’, असे म्हणून प्रार्थना थोडा वेळ माझ्याशी बोलली आणि नंतर तिने शुभेच्छा व्यक्त करणारे संस्कृतमधील एक काव्य मला म्हणून दाखवले. तिचा आवाज सुमधुर आहे. ते काव्य ऐकतांना माझी भावजागृती झाली.

२. कु. प्रार्थना हिच्या लिखाणाची जाणवलेली वैशिष्ट्ये

प्रार्थनाने केलेले काही लिखाण माझ्याकडे संकलनासाठी आले होते, तसेच तिचे काही लिखाण मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वाचले. तिच्या लिखाणाची मला जाणवलेली काही वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

अ. प्रार्थनाचे लिखाण अभ्यासपूर्ण असते. तिच्या लिखाणातून तिची प्रगल्भता जाणवते.

आ. एका लेखात तिने ‘रामनाथी आश्रमातील आधुनिक वैद्य भिकाजी भोसलेकाका यांनी चुका सांगितल्यावर मनाला वाईट वाटत नाही’, असे लिहिले होते. यातून ‘ती ‘एखाद्या प्रसंगात मनाला काय जाणवते ?’, याचाही अभ्यास करते’, असे माझ्या लक्षात आले.

इ. तिने पू. हजारेकाकांविषयी (सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे यांच्याविषयी) लिहिलेली सूत्रे वाचतांना तो प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर उभा रहात होता.

ई. तिच्या लिखाणातून ‘तिचे साधना करून ईश्वरप्राप्ती करण्याचे ध्येय दृढ आहे’, हे लक्षात येते.

३. शिकण्याची वृत्ती

अ. तिने तिच्या संपर्कातील सर्वांकडून शिकायला मिळालेली सूत्रे लिहून दिली आहेत.

आ. तिने केलेल्या ग्रंथवाचनातून ‘ती नेमके काय शिकली ?’ आणि ‘त्यातील कोणती सूत्रे ती स्वतःच्या कृतीत आणण्याचा प्रयत्न करणार आहे’, या तिच्या विचारांत स्पष्टता जाणवते.

४. कु. प्रार्थनाच्या छायाचित्राची जाणवलेली वैशिष्ट्ये

अ. पूर्वीपासूनच मला तिच्यात व्यक्त भाव जाणवतो आणि तो भाव तिच्या छायाचित्रातील तोंडवळ्यावर दिसतो. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या तिच्या छायाचित्रात तो अधिकच जाणवतो.

आ. तिचे छायाचित्र पाहिल्यावर ‘आता ती आपल्याशी बोलेल’, इतका त्या छायाचित्रात जिवंतपणा जाणवतो.

इ. तिच्या छायाचित्रात समष्टी भावही जाणवतो. ‘ती इतरांशी काहीतरी संवाद साधत आहे’, असे मला जाणवते.

प.पू. गुरुदेवांच्या कृपेने प्रार्थनाविषयीची सूत्रे माझ्या लक्षात आली. ती मी त्यांच्या चरणी अर्पण करते.

श्री. नरेंद्र दाते

आधुनिक दंतवैद्य नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

१. अनासक्त

‘एवढ्या लहान वयातही प्रार्थना अनासक्त आहे’, असे मला वाटते.

२. अनुसंधानात असणे

प्रार्थना आश्रमातील लहान मुलांशी खेळत असली, तरी ‘ती मनाने गुरुदेवांच्या चरणांपाशीच आहे. ती स्थुलातून पृथ्वीलोकात असली, तरी ती मनाने कृष्णलोकातच आहे’, असे मला जाणवते.’

सौ. ज्योती दाते

सौ. ज्योती नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

‘कु. प्रार्थना ही दैवी बालिका आहे’, हे तिच्या वागण्या-बोलण्यातून आणि तिच्या प्रत्येक कृतीतून लक्षात येते.

१. प्रेमभाव

ती आश्रमातील सर्व बालसाधकांना समजून घेते. एखाद्या बालसाधकाला काही कारणाने वाईट वाटत असल्यास ती त्याची समजूत घालते.

२. प्रार्थना अत्यंत स्थिर असते. तिच्या वयाच्या मानाने ती पुष्कळ प्रगल्भ आहे. कोणत्याही परिस्थितीत ती विचलित होत नाही.

३. स्वीकारण्याची वृत्ती

ती कोणतीही परिस्थिती आनंदाने स्वीकारते. २ वर्षांपूर्वी ती पुणे सोडून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेली. सध्या ती रामनाथीहून देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात रहायला आली आहे. हे सर्व पालट तिने सहजतेने स्वीकारले आहेत.

४. आईची सेवा मनापासून करणे

काही सेवेनिमित्त प्रार्थनाचे वडील दुसरीकडे गेल्यामुळे काही दिवस आश्रमात प्रार्थना आणि तिची आई (सौ. मनीषा महेश पाठक), अशा दोघीच होत्या. तेव्हा ‘आईला चहा, प्रसाद (अल्पाहार) आणि महाप्रसाद आणून देणे, कपडे वाळत घालणे’, या सर्व सेवा तिने मनापासून केल्या.

५. चूक झाल्यावर खंत वाटणे

तिच्याकडून एखादी चूक झाल्यास तिला त्याविषयी पुष्कळ खंत वाटते. ती लगेच फलकावर चूक लिहिते आणि त्याचे प्रायश्चित्त घेते.

६. तिचे कुणी कौतुक करत असल्यास ती लगेच सर्व श्रेय परात्पर गुरु डॉ. आठवले यांना देते.

७. सेवेची तळमळ

ती अखंड सेवारत रहाण्याचा प्रयत्न करते.

७ अ. प्रार्थनाने रामनाथी आश्रमात असतांना केलेल्या सेवा : बागेतील झाडांना पाणी घालणे आणि बागेतील पालापाचोळा गोळा करणे, औषधांच्या पुड्या बांधणे आणि ध्यानमंदिरात आरतीची पूर्वसिद्धता करून आरती करणे, दत्तमाला मंत्रपठणाची पूर्वसिद्धता करून त्यापूर्वीची प्रार्थना करणे

७ आ. सध्या देवद आश्रमात असतांना प्रार्थना करत असलेल्या सेवा : आरतीच्या वेळी टाळ वाजवणे, जेवणाचे पटल आवरण्यास साहाय्य करणे इत्यादी.

८. भाव

अ. तिच्याकडे धातूची श्रीकृष्णाची मूर्ती आहे. प्रार्थनातील उच्च कोटीच्या भावामुळे तिच्याकडे असलेल्या या श्रीकृष्णाच्या मूर्तीत पालट होत आहेत. प्रार्थना श्रीकृष्णाच्या मूर्तीला प्रतिदिन स्नान घालते आणि श्रीकृष्णाला अंथरूण-पांघरूण घालून झोपवते.

आ. ‘तिचे एक वेगळेच भावविश्व असून त्यात ती रममाण आहे’, असे जाणवते. ‘तिच्या भावविश्वात ती श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉक्टर) यांच्या अखंड अनुसंधानात आहे’, असे जाणवते.

इ. तिच्यातील भावामुळे तिचे सौंदर्य दैवी असल्याचे जाणवते.

९. तिच्या आवाजात गोडवा आहे. ‘तिचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते. तिच्या बोलण्यात चैतन्य जाणवते.

१०. कु. प्रार्थना हिच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

अ. ‘कु. प्रार्थना हे नर्मदा नदीचे रूप आहे’, असे मला वाटते. ‘नर्मदा प्रदक्षिणा करतांना काही जणांना नर्मदामाता कुमारी रूपात दर्शन देते’, असे मी ऐकले आहे. त्याप्रमाणे प्रार्थनाकडे पाहिल्यावर ‘ती अत्यंत सात्त्विक, निरागस आणि निर्मळ, असे देवीचे रूप आहे’, असे मला जाणवते. (नुकतेच माझ्या वाचनात आले, ‘भगवान शंकराच्या घर्मबिंदूंपासून नर्मदा नदीची उत्त्पत्ती झाली’, असे मानले जाते.’ यावरून ‘नर्मदेचा पिता महादेव आहे’, हे लक्षात येते. प्रार्थनाच्या वडिलांचे नावही ‘महेश’ आहे.  ‘महेश’ हे शिवाचे नाव आहे. (श्री. महेश पाठक यांची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के आहे.)

आ. तिच्याकडे पाहिल्यावर ‘तिचा स्थूल देह समोर आहे’, असे न जाणवता एक अत्यंत तरल, हलके आणि पांढरेशुभ्र, असे अस्तित्व जाणवते.

अशा या दैवी आणि अखंड भावस्थितीत रहाणार्‍या प्रार्थनाविषयी कितीही लिहिले, तरी ते अल्पच आहे. ‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच मला तिचा सहवास मिळत आहे आणि तिच्याकडून शिकता येत आहे’, याबद्दल मी प.पू. गुरुदेवांच्या कोमल अन् पावन चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १०.३.२०२२)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक