अमरावती येथील सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७१ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया (२० मार्च २०२२) या दिवशी पू. अशोक पात्रीकर यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…

पू. अशोक पात्रीकर

फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया (२० मार्च २०२२) या दिवशी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास पाहूया.

पू. अशोक पात्रीकर यांच्या चरणी त्यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

‘पू. अशोक पात्रीकर यांनी कोणताही संकोच न बाळगता ‘त्यांचे साधनेत येण्यापूर्वीचे जीवन कसे होते’, हे या लेखात दिले आहे. तेव्हा त्यांची असलेली नकारात्मक वैशिष्ट्ये वाचून ‘अशी व्यक्ती पुढे ‘संत’ होऊ शकते’, हे कुणाला खरे वाटणार नाही; पण त्यांनी ते खरे करून दाखवले आहे. असा आदर्श सर्वांपुढे ठेवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे, तेवढे थोडे ! त्यांची अनेक गुणवैशिष्ट्ये या लेखमालेतून प्रकाशित होणार आहेत. त्यांचा सर्वांना लाभ घेता येईल !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.२.२०२२)

१. जन्म ते ८ वर्षे

१ अ. जन्मनाव ‘पुरुषोत्तम’ असूनही वडिलांनी ‘अशोक’ हे नाव ठेवणे : ‘फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया, ६.३.१९५० या दिवशी माझा जन्म अमरावती येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. माझे जन्मनाव ‘पुरुषोत्तम’, असे पत्रिकेत नमूद केले आहे; पण माझ्या वडिलांनी ((कै.) वासुदेव नारायण पात्रीकर यांनी) माझे नाव ‘अशोक’ ठेवले. त्याचे कारण मी त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘आपल्या कुटुंबात शोकाचे प्रसंग पुष्कळ अल्प आले आहेत. दुसरे कारण, म्हणजे अशोक नावाचा एक थोर राजा होऊन गेला.’’ त्यांनी माझे ‘अशोक’ हेच नाव शाळेत घातले आणि त्यामुळे मी व्यवहारासाठी तेच नाव वापरत आहे. त्यांनी स्वकष्टाने बांधलेल्या घराचे नावही ‘अशोक’, असे ठेवले होते. असे असले, तरी माझे घरातील लाडके नाव ‘श्याम’ असे आहे.

१ आ. ‘३ मुलींनंतर मुलगा व्हावा’, यासाठी आईने एका संतांकडून विभूती घेतल्यावर पू. अशोक पात्रीकर यांचा जन्म होणे आणि त्यानंतर त्यांचा विवाह होईपर्यंत त्यांनी आईच्या समवेत त्या संतांच्या दर्शनाला जाणे : मला तीन मोठ्या बहिणी ((कै.) श्रीमती उषा दत्तात्रय टेंभेकर, (कै.) सौ. निशा दत्तात्रय धनागरे आणि सौ. सुलभा भालचंद्र रुद्र) होत्या. त्यामुळे ‘मुलगा व्हावा’, यासाठी माझ्या आईने ((कै.) श्रीमती लीला वासुदेव पात्रीकर यांनी) समर्थ संप्रदायाचे संत पू. फणसाळकर महाराज (अमरावती) यांच्याकडून विभूती आणि प्रसाद घेतला होता. त्यानंतर माझा जन्म झाला.

त्यानंतर आई मला प्रतीवर्षी दासनवमीला त्यांच्या दर्शनासाठी घेऊन जात असे. त्या वेळी ‘अध्यात्म म्हणजे काय ?’, हे कळत नसल्याने ‘आईच्या समवेत महाराजांकडे जाणे आणि त्यांनी दिलेली विभूती अन् ओल्या नारळाच्या गोड वड्या हा प्रसाद घेऊन घरी परत येणे’, असे मी करत असे. माझ्या जन्मानंतर मला आणखी एक बहीण (सौ. स्वाती कमलनयन शिरोळकर) झाली. नोकरीसाठी अमरावतीला असेपर्यंत आणि माझा विवाह होईपर्यंत मी पू. फणसाळकर महाराज यांच्याकडे आईच्या समवेत प्रतीवर्षी जायचो.

१ इ. लहानपणापासून चारचाकी वाहनात बसण्याची आवड असणे आणि शेजारच्यांकडे जाऊन त्यांच्या बंद गाडीत बसणे : मी ४ – ५ वर्षांचा असल्यापासून मला चारचाकी वाहनात बसण्याची पुष्कळ आवड होती. (ती आवड मला आजही आहे.) त्या काळी चारचाकी फारच अल्प जणांकडे असायची. अमरावतीला आमच्या शेजारी रहाणार्‍या श्री. नाशिककर यांच्या घरी एक बंद स्थितीतील चारचाकी होती. मी प्रतिदिन तिच्यात जाऊन बसायचो. माझ्या बहिणी तेथे येऊन मला तेथून घरी घेऊन जायच्या. वर्ष २०१७ मध्ये मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी आलो असतांना एका अपरिचित वयस्कर महिलेने मला ‘तू श्याम पात्रीकर ना रे ?’, असे विचारले. त्यावर मी ‘हो’ म्हटल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मी अमरावतीच्या नाशिककर यांची मुलगी आहे. तू लहानपणी आमच्या बंद चारचाकीत येऊन बसायचा.’’ साधारण ६५ वर्षांनंतरही त्या काकूंनी मला ओळखले. तेव्हा मला आश्चर्य वाटले. मला तर काहीच आठवत नव्हते.

१ ई. प्रतीवर्षी घरी श्रीरामनवमी साजरी होणे आणि वडिलांनी प्रतीवर्षी गुरुचरित्र वाचल्यावर दुसर्‍या दिवशी सत्यनारायणाची पूजा केली जाणे : माझे वडील दत्तभक्त होते आणि ‘श्रीराम’ हे आमचे कुलदैवत आहे. ते प्रतिदिन देवपूजा करायचे. प्रतीवर्षी आमच्या घरी श्रीरामनवमी साजरी केली जायची. दुपारी १२ वाजता श्रीरामजन्माच्या वेळी आरती व्हायची. नंतर पंजिरीचा (टीप) प्रसाद घेऊन जेवण करायचे. माझे वडील प्रतीवर्षी गुरुचरित्र वाचायचे आणि दुसर्‍या दिवशी घरी सत्यनारायणाची पूजा असायची. तेव्हा आम्ही परिसरातील सर्वांना तीर्थप्रसादासाठी बोलवायचो. एवढेच कर्मकांडातील सोहळे आमच्या घरी साजरे व्हायचे.

टीप – यात धन्याची पूड करून तिच्यामध्ये गूळ किंवा साखर घालून ते सर्व पदार्थ एकत्रित केले जातात.

१ उ. वडिलांचे स्थानांतर अमरावतीहून नागपूरला झाल्यावर इयत्ता तिसरीपर्यंतचे शिक्षण नागपूर येथे होणे : वडील शासनाच्या बांधकाम विभागात काही वर्षे ‘अभियंता’ या पदावर होते. नंतर काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी त्याच विभागात रेखाचित्र (drawing) शाखेत नोकरी केली. माझ्या जन्मानंतर वडिलांचे स्थानांतर (बदली) अमरावती येथून नागपूर येथे झाले. माझे इयत्ता तिसरीपर्यंतचे शिक्षण नागपूर येथे झाले. नागपूरला असतांना मी ८ वर्षांचा झाल्यावर माझी मुंज झाली.

१ ऊ. कुटुंबाच्या समवेत मुंबईला गेल्यावर मार्ग विसरणे आणि त्या वेळी लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे धीटपणे देता येणे : मी ८ वर्षांचा असतांना कुटुंबासहित मुंबई पहाण्यासाठी गेलो होतो. तिथे खेळायला गेल्यावर मी मार्ग विसरलो. त्या वेळी मी रडू लागल्यावर काही लोकांनी मला त्याविषयी विचारले. तेव्हा मी त्यांच्या प्रश्नांची धीटपणे उत्तरे दिली, तसेच आम्ही ज्या विश्रामालयात (हॉटेलमध्ये) उतरलो होतो, त्याचा पत्ता मी त्यांना सांगितला, ही देवाचीच कृपा ! नंतर घरचे सर्व जण तेथे येऊन मला घेऊन गेले.

२. वय ९ ते २० वर्षे

२ अ. आई-वडिलांनी चांगले संस्कार करणे : वडिलांचे नागपूरनंतर पुन्हा अमरावतीला स्थानांतर झाल्याने माझे इयत्ता चौथीपासून स्थापत्य शाखेतील पदविकेपर्यंतचे शिक्षण अमरावती येथे झाले. नोकरी लागल्यानंतर पुढील ९ वर्षे मी अमरावती येथेच होतो. मी १२ वर्षांचा होईपर्यंत आई-वडील आम्हा भावंडांकडून तिन्हीसांजेला शुभं करोती आणि रामरक्षा म्हणवून घ्यायचे, तसेच पाढ्यांचे पाठांतर करवून घ्यायचे.

२ आ. वडिलांनी श्राद्धपक्ष न करणे आणि सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावर आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे श्राद्धपक्ष करणे : प्रतीवर्षी पितृपक्षात शेजार्‍यांकडे श्राद्ध होत असे. थोडे कळायला लागल्यावर मी वडिलांना विचारले, ‘‘आपल्या घरी श्राद्ध का करत नाहीत ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपले पूर्वज खाऊन-पिऊन सुखी होते. त्यामुळे आपण श्राद्ध करत नाही.’’ वडील पितृपक्षातील अमावास्येला केवळ एका ब्राह्मणाला घरी बोलावून त्यांना दही आणि पेढे यांचा नैवेद्य दाखवायचे.

मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावर आणि आई-वडील यांच्या मृत्यूनंतर आम्ही त्यांचे श्राद्ध करत होतो. ‘साधनेत प्रगती झाल्यामुळे आता श्राद्ध करायची आवश्यकता नाही’, असे एका संतांनी सांगितल्यावर आम्ही ते बंद केले.

२ इ. घरी न सांगता चित्रपट पहायला गेल्याने आई-वडिलांनी मारणे आणि त्यानंतर चित्रपट पहाणे बंद करणे : मी १० वर्षांचा असतांना अमरावतीला एका परिचिताच्या समवेत घरी न सांगता चित्रपट पहायला गेलो होतो. आल्यानंतर आई-वडिलांनी मला पुष्कळ मारले. त्याचा परिणाम म्हणून की काय, त्यानंतर मी चित्रपट पहाणे बंद केले आणि तेव्हापासून आतापर्यंत मी चित्रपट पहायला गेलो नाही.

२ ई. निवासाच्या बाजूला एका कुटुंबाच्या घरी प्रत्येक गुरुवारी पंचपदी भजन असणे आणि तेथे भजनाला जात असल्याने भजनाची गोडी लागणे : वडिलांचे अमरावतीला स्थानांतर झाल्यावर आम्हाला निवासासाठी शासकीय निवासस्थान मिळाले होते. तेथे प्रतीवर्षी गणेशोत्सव साजरा केला जायचा. आमच्या निवासाजवळील एका कुटुंबाच्या घरी प्रत्येक गुरुवारी पंचपदी भजन असायचे. मी भजनाला जात असे आणि कधी कधी ते काका सांगतील, ते भजन त्यांच्या वहीत पाहून म्हणत असे. तेव्हापासून मला भजनाची थोडी गोडी लागली. माझ्या आईला भजनाची आवड होती.

२ उ. वडील निवृत्तीनंतरही ‘इमारतीच्या बांधकामांचे नकाशे काढणे आणि प्रत्यक्ष बांधकामे करणे’, ही कामे वयाच्या ८२ व्या वर्षापर्यंत करत होते. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे अल्पशा विकाराने निधन झाले.

२ ऊ. घराचे नाव ‘अशोक’ आणि परिसराचे नाव ‘श्यामनगर’ असल्याने दोन्ही नावांचा योग देवाच्या कृपेने जुळून येणे : माझा भाचा (श्री. हेमंत दत्तात्रेय टेंभेकर) काही दिवस आमच्याकडे शिकायला होता. तो मला ‘मामा’ म्हणायचा; म्हणून नगरातील सर्व मला ‘श्याममामा’ म्हणत. आमचे घर ज्या परिसरात होते, त्या भागात श्यामबाबा नावाचे एक साधू रहायचे. त्यामुळे त्या परिसराचे नावही ‘श्यामनगर’ असेच होते. त्यामुळे मी ‘नगरमामा’ झालो होतो; म्हणजे घराचे नाव ‘अशोक’ आणि नगराचे नाव ‘श्यामनगर’, अशा माझ्या दोन्ही नावांचा योग देवाच्या कृपेने जुळून आला होता.

२ ए. माध्यमिक शिक्षण घेतांना नावडत्या विषयात प्रवेश मिळाल्याने व्यसनी विद्यार्थ्यांशी मैत्री होऊन अभ्यासात मागे पडणे अन् अकराव्या इयत्तेत दुसर्‍या श्रेणीत उत्तीर्ण होणे : विद्यार्थीदशेत मी एक सामान्य विद्यार्थी होतो. सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाळेने माझी ‘जीवशास्त्र’ (biology) या विषयासाठी निवड करून त्या शाखेत प्रवेश दिला. माझ्या वडिलांची ‘मी आधुनिक वैद्य (डॉक्टर) व्हावे’, अशी इच्छा नव्हती; कारण आधुनिक वैद्य असलेला माझा एक चुलत भाऊ लहान वयात मृत्यू पावला होता. त्यामुळे वडिलांनी शिक्षण विभागातील अधिकार्‍यांना भेटून मला गणित-विज्ञान शाखेत प्रवेश मिळवून दिला. मला गणित हा विषय कठीण वाटायचा; पण त्या काळी वडिलांच्या समोर बोलायचे धैर्य नसायचे. गणित या विषयात मन लागत नसल्याने मी काही व्यसनी विद्यार्थ्यांशी मैत्री केली. त्याचा वाईट परिणाम होत गेला आणि मी अभ्यासात मागे पडत गेलो. दहावीत असतांना मला अनुकृती (कॉपी) करतांना पकडले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी माझ्या घरी ही वार्ता कळवली आणि मला दहा रुपये दंड केला. त्या वार्तेने मी वडिलांच्या हातचा मार खाल्ला. नंतर मी थोडा सावरलो आणि अकराव्या इयत्तेत दुसर्‍या श्रेणीत उत्तीर्ण झालो. मी अकरावीत असतांना वडील निवृत्त झाल्याने आम्हाला शासकीय निवासस्थान सोडावे लागले. तोपर्यंत वडिलांनी स्वतःचे घर बांधले होते. त्या घरात आम्ही रहायला गेलो.

२ ऐ. तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेतल्यावर पान आणि तंबाखू खाण्याचे व्यसन लागणे अन् त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण-नागबळी हा विधी केल्यावर पत्नीने व्यसन सोडायला सांगितल्यावर देवाच्या कृपेने ते सोडू शकणे : मी अकरावी उत्तीर्ण होईपर्यंत वडील निवृत्त झाले होते. तेव्हा दोन बहिणींचे विवाह शेष असल्याने आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. ‘मी लवकर नोकरी करून आर्थिक भार उचलावा’, यासाठी त्यांनी मलाही स्थापत्य शाखेत पदविका अभ्यासक्रमासाठी तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घ्यायला लावला. घरापासून तंत्रनिकेतन ५ कि.मी. अंतरावर होते. पहिले वर्ष मी बसने जात असे. दुसर्‍या वर्षी वडिलांनी हप्त्याने पैसे देत मला सायकल घेऊन दिली. तंत्रनिकेतनमध्ये असतांना मला पान आणि तंबाखू खाण्याचे व्यसन लागले. ते व्यसन मी नोकरीत असेपर्यंत होते. नोकरीत खामगाव (जिल्हा बुलढाणा) येथे असतांना वर्ष १९८९ मध्ये आम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण-नागबळी हा विधी केल्यावर पत्नीने मला ते व्यसन सोडायला सांगितले आणि देवाच्या कृपेने मी ते सोडू शकलो.

२ ओ. अभ्यासासाठी जागरण होत असल्याने झोप न येण्याच्या गोळ्या घेणे, त्यामुळे शरिरातील उष्णता वाढणे आणि कर्मकांडातील उपायांच्या समवेत होमिओपॅथीचे औषध घेतल्याने तो त्रास पूर्णपणे न्यून होणे : मी तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेत असतांना अभ्यासासाठी मला रात्री जागरण करावे लागायचे. जागरण होत नसल्याने मी काही मित्रांच्या समादेशाने (सल्ल्याने) झोप न येण्याच्या गोळ्या घेऊ लागलो. पदविकेची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्या गोळ्यांचा दुष्परिणाम होऊन माझ्या शरिरातील उष्णता वाढून त्वचेवर फोड आले. बरीच औषधे घेऊनही मला गुण येत नव्हता. तेव्हा आईने कुणाला तरी विचारून कर्मकांडातील उपाय केले. त्या समवेत मी होमिओपॅथीचे औषध घेतल्याने माझा तो त्रास पूर्णपणे न्यून झाला.

२ औ. शिक्षण घेत असतांना व्यायामाचे महत्त्व समजल्यावर सूर्यनमस्कारादी व्यायामाला प्रारंभ करणे : त्याच काळात मला व्यायामाचे महत्त्व कळले आणि मी प्रतिदिन व्यायाम करू लागलो. माझ्या दुसर्‍या क्रमांकाच्या बहिणीचे पती श्री. दत्तात्रेय नारायण धनागरे हे प्रतिदिन अंघोळीपूर्वी व्यायाम करायचे. त्यामुळे मला प्रोत्साहन मिळून मीसुद्धा घरी सूर्यनमस्कारादी व्यायामाला आरंभ केला. विवाह झाल्यावरही काही दिवस ते प्रयत्न होत होते. नंतर नोकरीमुळे वेळ मिळत नसे. त्यामुळे माझा व्यायाम बंद झाला. (क्रमश:)

– (पू.) अशोक पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.८.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक