गांधी कुटुंबाने काँग्रेसचे नेतृत्व सोडावे ! – काँग्रेस नेते कपिल सिब्बल

काँग्रेसच्या नेत्याने सांगितले आणि गांधी परिवाराने ते ऐकले, असे कधीतरी होईल का ? काँग्रेसमध्ये गेली ७५ वर्षे घराणेशाही मुरलेली आहे, ती सहजासहजी कशी संपणार ? ती काँग्रेससमवेतच संपेल आणि जनता तिला लवकरच संपवेल, हे मात्र निश्‍चित ! – संपादक

नवी देहली – गांधी कुटुंबाने काँग्रेसचे नेतृत्व सोडावे आणि इतर एखाद्या व्यक्तीला संधी द्यावी, असे परखड मत काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी व्यक्त केलेे. ‘गांधी यांनी स्वेच्छेने बाजूला व्हावे; कारण त्यांनी नियुक्त केलेल्या मंडळातील लोक कधीच त्यांना ‘तुम्ही नेतृत्व सोडा’ असे सांगणार नाहीत’ असेही सिब्बल म्हणाले. ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची आत्मपरीक्षण बैठक १३ मार्च या दिवशी झाली. या बैठकीनंतर सिब्बल यांनी हे मत व्यक्त केले आहे.

कपिल सिब्बल पुढे म्हणाले की,

१. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व फार संकुचित विचार करत असून त्यांना मागील ८ वर्षांमध्ये पक्षाची पडझड का होत आहे ?, याची कारणे ठाऊक नाहीत.

२. जसे मला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्याविषयी आश्‍चर्य वाटले नाही, तसेच या पराभवानंतरही काँग्रेसमधील नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याकडेच नेतृत्व असावे, हा निर्णय घेतल्याचेही आश्‍चर्य वाटले नाही.

३. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बाहेरील बर्‍याच नेत्यांची मते ही कार्यकारी समितीच्या मतांपेक्षा फार वेगळी आहेत. कार्यकारी समितीच्या बाहेरही काँग्रेस पक्ष आहे. त्यांची मतेही ऐकून घ्यावीत. आमच्यासारखे अनेक नेते आहेत जे कार्यकारी समितीमध्ये नाहीत; पण ते काँग्रेस पक्षात असून त्यांची मते वेगळी आहेत. ‘कार्यकारी समिती हीच संपूर्ण भारतातील काँग्रेसचे प्रतिनिधित्व करते’, असे त्यांना वाटते. हे अयोग्य आहे.

४. मी सर्वांच्या वतीने बोलू शकत नाही; पण पूर्णपणे माझे वैयक्तिक मत मांडायचे झाल्यास किमान मला तरी ‘सब की काँग्रेस’ असा पक्ष हवा आहे, तर काहींना ‘घर की काँग्रेस’ हवा आहे. मी माझ्या शेवटच्या श्‍वासापर्यंत ‘सब की काँग्रेस’साठी झगडत राहीन. या ‘सब की काँग्रेस’चा अर्थ केवळ एकत्र येणे हा नाही, तर ज्यांना देशामध्ये भाजप नको, अशा लोकांनी एकत्र येणे, असा आहे.

अध्यक्षपद नसतांनाही राहुल गांधी निर्णय कसे घेतात ?

सिब्बल राहुल गांधी यांच्याविषयी म्हणाले की, आता राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत. त्या पदावर सोनिया गांधी आहेत. निवडणुकीपूर्वी राहुल गांधी पंजाबमध्ये गेले आणि त्यांनी ‘चन्नी हे मुख्यमंत्री असतील’ अशी घोषणा केली; पण त्यांनी हा निर्णय कोणत्या अधिकाराने घेतला ? ते पक्षाचे अध्यक्ष नाहीत, तरी ते सर्व निर्णय घेतात. ते आधीच अपयशी अध्यक्ष आहेत. असे असतांना काँग्रेसमधील लोक पुन्हा राहुल यांनाच का नेतृत्व करायला का सांगत आहेत ?