रशियाकडे केवळ १० दिवस पुरेल इतकाच दारुगोळा शिल्लक ! – अमेरिकेच्या माजी सैन्यदल प्रमुखाचा दावा

वॉशिंग्टन (अमेरिका) – युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला २० दिवस झाले असले, तरी ते अद्याप थांबलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर ‘रशियाकडे केवळ १० दिवस उरले आहेत. या १० दिवसांत युक्रेनने खिंड लढवली, तर रशिया आपोआपच चितपट होईल, असा दावा अमेरिकेचे माजी सैन्यदल प्रमुख बेन होजेस यांनी केला आहे.

बेन होजेस म्हणाले की, रशियाचे युक्रेनवर आक्रमण, ही एक जलद सैनिकी कारवाई होती. रशियाला काही घंट्यांत युक्रेन कह्यात घ्यायचे होते; परंतु युक्रेनी सैन्याने जोरदार प्रतिकार केल्याने त्याचे रूपांतर युद्धात झाले. रशियाकडे युद्ध चालू ठेवण्यासाठी पुरेसा दारुगोळा नाही. त्याचा साठा संपत आला आहे. एवढ्या तातडीने नवीन दारुगोळा बनवणे किंवा उपलब्ध करणे हेदेखील निर्बंधांमुळे शक्य नाही. पुढील १० दिवसांत हा दारुगोळा संपून जाईल आणि रशिया लढण्याच्या स्थितीत रहाणार नाही. दुसरीकडे युरोपीय देश आणि अमेरिका यांनी युक्रेनला शस्त्रास्त्रे देणे चालू केले आहे. यामुळे युक्रेनी सैन्य त्यांचे युद्ध पुढे चालू ठेवणार आहे. अमेरिकेने यासाठी युक्रेनला निधीची तरतूदही केली आहे. या निधीतून युक्रेन प्रत्येक देशाकडून घातक शस्त्रे विकत घेऊ शकणार आहे.

आम्ही चीनकडे साहाय्य मागितलेले नाही ! – रशियाचे स्पष्टीकरण

रशियाने चीनकडे सैन्य साहाय्य मागितल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. त्यावर रशियाने स्पष्टीकरण देतांना ‘आम्ही चीनकडे साहाय्य मागितलेले नाही’, असे म्हटले,  हा अमेरिकेचा दुष्प्रचार आहे, असे रशियाने म्हटले आहे. अमेरिकेने आधीच स्पष्ट केले आहे की, चीनने रशियाला साहाय्य केले, तर अमेरिका चीनवर कठोर कारवाई करील.