खेळात प्राविण्यप्राप्त व्यक्तीची क्रीडाशिक्षकपदी नियुक्ती करण्याचे नवीन धोरण आणणार ! – कु. अदिती तटकरे, क्रीडाराज्यमंत्री

कु. अदिती तटकरे, क्रीडाराज्यमंत्री

मुंबई, १४ मार्च (वार्ता.) – खेळात प्राविण्य प्राप्त केलेल्या व्यक्तीची  क्रीडाशिक्षक म्हणून नियुक्ती केल्यास ते विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतील. क्रीडा विभागाकडून याविषयीचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाला पाठवण्यात येईल. यापूर्वीच्या क्रीडाधोरणात पालट करून नवीन क्रीडाधोरण आणण्यात येईल, अशी माहिती क्रीडाराज्यमंत्री कु. अदिती तटकरे १४ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिली.
मल्लखांबामध्ये जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेल्या खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्त करण्याविषयी भाजपचे आमदार भाई गिरकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देतांना तटकरे यांनी शासनाच्या धोरणाची माहिती दिली. क्रीडामंत्री सुनील केदार यांनी येत्या २ मासांत हे क्रीडाधोरण निश्चित करण्यात येईल, असे या वेळी सभागृहात सांगितले.

याविषयी सविस्तर माहिती देतांना कु. अदिती तटकरे म्हणाल्या, ‘‘क्रीडाक्षेत्रात यश संपादन केलेल्या खेळाडूंना सरळ सेवा समावेशाद्वारे ५ टक्के आरक्षण देण्यात येते. मल्लखांब आणि खो-खो या खेळांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यासह महाराष्ट्राच्या मातीतील अन्य खेळांचाही यामध्ये समावेश करण्याच्या दृष्टीने अभ्यास केला जाईल.’’