परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग मिळाल्यापासून फोंडा (गोवा) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १० वर्षे) हिच्यात जाणवलेले पालट

‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’

‘आमची मुलगी कु. श्रिया राजंदेकर हिला प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने २ – ३ वेळा त्यांचा सत्संग मिळाला. त्यांच्या सत्संगामुळे कु. श्रियामध्ये आध्यात्मिक स्तरावर पालट होत आहेत. श्रियामधील हे पालट प.पू. गुरुदेव तिच्यावर करत असलेल्या साधनेच्या संस्कारांमुळेच आहेत. पालक म्हणून श्रियाला घडवण्यासाठी आम्हाला वेगळे काहीच प्रयत्न करावे लागले नाहीत. ‘श्रियामधील सर्व गुण तिला प.पू. गुरुदेवांकडूनच मिळाले आहेत’, असे आम्हाला नेहमीच जाणवते. ‘श्रियाला प.पू. गुरुदेवांच्या मिळालेल्या सत्संगातून प.पू. गुरुदेव केवळ श्रियालाच घडवत नसून तिच्या माध्यमातून ते आम्हालाही साधनेच्या दृष्टीने घडवत आहेत’, असे आम्हाला जाणवते. श्रियाला मिळालेला हा अमूल्य सत्संग, म्हणजे आमच्या कुटुंबासाठीचाच सत्संग आहे. गुरुकृपेने तिला मिळालेल्या या सत्संगाविषयी आणि प.पू. गुरुदेवांच्या कृपेने श्रियामध्ये होत असलेल्या आध्यात्मिक पालटांविषयी शब्दांत कृतज्ञता व्यक्त करणे अशक्यच आहे.

कु. श्रिया राजंदेकर

(भाग १)

आई-वडिलांनो, दैवी बालकांना साधनेत विरोध करू नका, तर त्यांच्या साधनेकडे लक्ष द्या !

‘काही दैवी बालकांचा आध्यात्मिक स्तर इतका चांगला असतो की, ती वयाच्या २० – २५ व्या वर्षीही संत होऊ शकतात. काही आई-वडील अशा बालकांना पूर्णवेळ साधना करण्यास विरोध करतात आणि त्यांना मायेतील शिक्षण घ्यायला लावून त्यांचे आयुष्य फुकट घालवतात. साधकाला साधनेत विरोध करण्याइतके महापाप दुसरे नाही. हे लक्षात घेऊन अशा आई-वडिलांनी मुलांची साधना चांगली होण्याकडे लक्ष दिले, तर आई-वडिलांचीही साधना होऊन तेही जीवन-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.५.२०१८)

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्री. अनिरुद्ध राजंदेकर

१. शिकण्याची वृत्ती, जिज्ञासा आणि प्रगल्भता वाढणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग मिळाल्यापासून ‘प्रत्येक प्रसंगातून नेमकेपणाने कसे आणि काय शिकायचे ?’, हे तिच्या लक्षात येते.त्यामुळे दिवसभरात घडणार्‍या विविध प्रसंगांतून ती सतत शिकण्याचा प्रयत्न करते. ‘घडलेल्या त्या प्रसंगात प.पू. गुरुदेवांनी काय सांगितले असते ? काय शिकवले असते ?’, असा विचार करून ती ते सूत्र लिहून काढते. त्यामुळे तिची सतत शिकण्याची वृत्ती जागृत राहून तिच्यातील ‘जिज्ञासा’ हा गुण आपोआपच वाढला आहे. ‘एखाद्या प्रसंगात काही अडचण असेल, तर तिच्यावर उपाययोजना कशी अन् कोणती करावी ?’, याचेही तिला अचूक उत्तर देता येऊ लागले आहे. यामुळेच तिच्यातील ‘प्रगल्भता’ हा गुणही आपोआपच वाढला आहे. तिच्यातील या सर्व गुणांची दिवसभरातील विविध प्रसंगांत आम्हाला जाणीव होते.

सौ. मानसी राजंदेकर

२. देहबुद्धी न्यून होणे

‘श्रियाची देहबुद्धी पुष्कळच न्यून झाली आहे’, असे आम्हाला जाणवते. तिला कपडे किंवा दागिने इत्यादींविषयी आवड असली, तरी ती कोणत्याच गोष्टीचा हट्ट करत नाही. बर्‍याच वेळा चित्रीकरणासाठी सात्त्विकतेच्या दृष्टीने वेशभूषा करावी लागते; परंतु श्रियाचे त्याविषयी कधीच गार्‍हाणे नसते.

२ अ. कपड्यांविषयी लहानग्या श्रियाचा दृष्टीकोन ! : ‘एकदा श्रिया म्हणाली, ‘‘आपण कोणते कपडे घालतो किंवा बाह्यतः कसे दिसतो ?’, हे देवाच्या आणि श्री गुरूंच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. देव ‘आपले मन कसे आहे ?’, हे बघतो. श्री गुरूंना आपले सुंदर मन आवडते. आपल्या मनात देवासाठी आणि श्री गुरूंसाठी सुंदर स्थान असायला पाहिजे. बाकीच्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या नाहीत.’’

३. मायेतील विषयात न रमता सतत सत्मध्ये रहाणे आणि आई-वडिलांनाही तसे करण्यास सांगणे

श्रिया मायेतील विषयात फार वेळ रमत नाही. त्यापेक्षा तिला ‘सत्संग, गं्रथवाचन, श्री गुरूंचे स्मरण करणे, सेवा करणे’, हेच चांगले वाटते. तिला मायेतील कार्यक्रमांना जायला फारसे आवडत नाही. अशा कार्यक्रमांच्या वेळी श्रिया ‘सगळीकडे साक्षीभावाने बघायचे’, असा विचार करते. ती आम्हालाही मायेतील विषयांवर फार बोलू देत नाही किंवा त्यांचा विचार करू देत नाही. तिच्यामुळे आम्हालाही सतत देवाच्या अनुसंधानात रहाण्याची सवय झाली आहे.

४. तत्त्वनिष्ठता वाढल्याचे जाणवणे

श्रिया लहानपणापासूनच तत्त्वनिष्ठ आहे; परंतु तिला परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग मिळाल्यापासून ती तिचे म्हणणे अधिक तत्त्वनिष्ठतेने सांगायला लागली आहे. साधनेविषयीचे सूत्र सांगतांना किंवा मायेतील विषयांविषयी बोलतांनाही तिच्या बोलण्यात भावनाप्रधानता न जाणवता ती तत्त्वतः जे योग्य आहे, तेच सांगते. आमच्याशी बोलतांना किंवा एखाद्या प्रसंगात तिचे मत मांडतांना मानसिक स्तरावर न बोलता तत्त्वनिष्ठतेने आणि नम्रतेने ती तिचे मत मांडते. प्रसंग कुठलाही असो, साधनेशी संबंधित असो किंवा व्यवहारातील, श्रिया प्रत्येक वेळी प.पू. गुरुदेवांनी सांगितलेला आध्यात्मिक स्तरावरील योग्य विचारच आम्हाला सांगते. अशा वेळी आम्हाला पुष्कळ आश्चर्य वाटते आणि आमच्याकडून प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त होते.

५. साक्षीभाव वाढणे

मागील काही मासांपासून श्रियामधील साक्षीभाव पुष्कळच वाढला आहे. ती तिच्याभोवती घडणार्‍या सर्वच प्रसंगांकडे साक्षीभावाने पहाते. ‘तिच्या सभोवताली काय चालू आहे ? तिच्याभोवती असणारी परिस्थिती सकारात्मक आहे कि नकारात्मक ?’, याचा तिच्यावर कुठलाही परिणाम होत नाही. कधी कुणी संत किंवा साधक तिचे कौतुक करतात, तेव्हाही श्रिया साक्षीभावातच असते. आम्ही रामनाथी आश्रमात गेल्यावर बरेच साधक तिचे कौतुक करतात. साधक तिला विचारतात, ‘‘तू साधनेचे काय प्रयत्न करतेस ?’’ तेव्हा श्रिया ‘सर्वकाही प.पू. गुरुदेवच करतात’, असे सहजतेने सांगते. साधकांनी केलेले कौतुक ऐकतांना तिच्या तोंडवळ्यावरील भाव जराही पालटत नाहीत. चांगल्या प्रसंगात ती अतीआनंदाने किंवा उत्साहाने हुरळून जात नाही किंवा प्रतिकूल प्रसंगात दुःखी होत नाही. ‘जे झाले, ते देवाच्या इच्छेने झाले’, असे म्हणून शांत रहाते.

६. स्थिरता वाढल्याचे जाणवणे

दिवसभरात विविध प्रसंग घडत असतात; परंतु श्रियाच्या स्थिरतेत जराही पालट होत नाही. गेले कित्येक दिवस तिच्या तोंडवळ्यावरील स्थिरतेत पालट झालेला आम्हाला दिसला नाही. श्रियामधील ही स्थिरता ‘तिचे डोळे, तिची प्रत्येक कृती आणि बोलणे’, यांतून प्रतिबिंबित होते. बर्‍याच वेळा श्रिया समोर आली की, तिच्यातील स्थिरतेमुळे आमच्या मनातील विचार नाहीसे होऊन आम्हाला स्थिरता अनुभवता येते. ‘श्रियामधील स्थिरता आध्यात्मिक स्तरावरील आहे’, असे आम्हाला जाणवते आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगामुळे ती अधिकच वाढली आहे. त्यामुळे तिच्या चालण्यात, बोलण्यात आणि वागण्यात एक प्रकारची लयबद्धता आली आहे. ‘दिवसभर तिच्या मनाची निर्विचार अवस्था असते’, असे तिच्या बोलण्यातून आम्हाला जाणवते.

७. स्थितप्रज्ञता वाढणे

श्रिया ‘प्रत्येक गोष्ट ईश्वरेच्छेने घडत आहे’, असा भाव ठेवते. त्यामुळे तिच्यातील ‘स्थितप्रज्ञता’ हा गुण वाढला आहे. श्रिया तिला येणार्‍या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे अगदी सहजतेने सांगते. त्यात ‘मी’, ‘माझे’ असे काहीच जाणवत नाही. काही वेळा ‘श्रिया आपल्यात असूनही आपल्यात नाही’, असे जाणवते.

८. सूक्ष्मातील जाणण्याच्या क्षमतेत वाढ होणे

पूर्वीपासून श्रियामध्ये सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असल्याचे तिच्या अनेक अनुभूतींमधून लक्षात आले आहे; परंतु ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगामुळे तिची ही क्षमता अधिकच वाढली आहे’, असे जाणवते. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने ‘प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्मातील परिणामांचा अभ्यास करायला पाहिजे’, हे तिला शिकायला मिळाले. त्यानुसार प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करून ती तसा अभ्यास करण्याचा प्रयत्न करते. तिच्या सूक्ष्मातील परीक्षणाचे वैशिष्ट्य, म्हणजे तिचे परीक्षण अगदी नेमक्या आणि मोजक्या शब्दांत असते. ती प.पू. गुरुदेवांनी सांगितलेल्या सर्व निकषांचा पूर्ण वापर करून योग्य शब्दांत परीक्षण मांडते.

९. चुकांविषयी खंत वाटणे आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणे

श्रियाला तिच्याकडून कळत नकळत झालेल्या सर्वच चुकांविषयी पुष्कळ खंत वाटते. तिला तिची चूक सांगितल्यावर ती मनापासून क्षमायाचना करते आणि ‘ती चूक परत होऊ नये’, यासाठी प्रयत्न करते. कधीतरी तिच्याकडून न झालेल्या चुकीविषयी तिला ‘तुझे चुकले’, असे सांगितले, तरी ती लगेच चूक स्वीकारते. याविषयी ती म्हणते, ‘‘देवाला आपण चूक स्वीकारलेली आवडते. आपण चूक केली नसेल, तरी देवाची इच्छा समजून ती स्वीकारायची. त्यामुळे आपला अहंभाव न्यून होतो.’’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के (वडील आणि आई), फोंडा, गोवा. (२६.१.२०२२)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक   
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.