१. आश्रमात वास्तव्यास येण्याच्या काही दिवस आधी श्री. अनिल सामंत यांना मोठ्या प्रमाणात फिट्स (आकडी) येत असल्याने त्यांना प्रथम स्थानिक आणि नंतर मोठ्या सरकारी रुग्णालयात भरती करण्यास सांगणे
‘श्री. अनिल सामंत (आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी दुर्गेश सामंत यांचा भाऊ) याला लहानपणापासूनच पूर्वजांचा आणि अनिष्ट शक्तींचा त्रास अन् तीव्र प्रारब्ध यांमुळे जीवनात प्रत्येक ठिकाणी दारूण अपयशाचा सामना करावा लागला. आश्रमात येण्याच्या ३-४ दिवस आधी त्याला अचानक फिट्स यायला लागल्या. त्याला डिचोली गावातील स्थानिक सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु फिट्सची तीव्रता एवढी होती की, तेथील आधुनिक वैद्यांनी काही घंट्यांतच त्याला म्हापसा येथील मोठ्या सरकारी रुग्णालयात भरती करण्यास सांगितले. तेथेही त्याच्या फिट्स थांबत नव्हत्या. ‘मी रामनाथी येथून म्हापसा येथे पोचेपर्यंत मला तो भेटतो कि नाही’, एवढी त्याची स्थिती बिकट होती. नेमके त्याच वेळी आई (६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा सामंत) सिंधुदुर्गातील मूळ गावी गेली होती. माझे पती डॉ. दुर्गेश पुण्याला गेले होते. त्यामुळे गोव्यात श्री. अनिल याची पत्नी (सौ. अदिती सामंत), मी आणि माझा मुलगा मुकुल एवढेच कुटुंबीय होतो.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना समजल्यावर त्यांनी श्री. अनिल यांना आश्रमात राहून उर्वरित उपचार करायला सांगणे
मी रुग्णालयात त्याच्यासमवेत ३ दिवस राहिले. तोपर्यंत त्याला फिट्स येणे थांबले होते; परंतु शारीरिक स्थिती अत्यंत नाजूक होती. हे सूत्र श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना समजल्यावर त्यांनी श्री. अनिल याला आश्रमात राहून उर्वरित उपचार करायला सांगितले.
श्री. अनिल सामंत यांच्यामध्ये बुद्धीअगम्य पालट केवळ गुरूंच्या संकल्पानेच होत गेले ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ‘श्री. अनिल यांचे साधनेत येण्यापूर्वीचे जीवन पाहिले, तर ते एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे कष्टप्रद जीवन जगत होते. त्यांना शारीरिक आणि आध्यात्मिक अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागले आहे. अशा स्थितीत ते आश्रमात रहायला आले. आश्रमात आल्यानंतर त्यांना नामजप, सेवा सांगितल्यावर त्या दिवसापासूनच त्यांनी ते प्रयत्न तात्काळ आणि मनापासून चालू केले. कोरोनाच्या काळात समाजातील व्यक्ती जेथे बाहेर जाऊन कोणतेही काम करण्यास धजावत नसे, त्या वेळी श्री. अनिल यांनी बाहेर जाऊन साधकांसाठी अत्यावश्यक वस्तू आणून देणे, त्यांना विविध प्रकारचे साहाय्य करणे आदी सेवा झोकून देऊन केली. त्यामुळेच त्यांच्यामध्ये पुष्कळ गतीने पालट होत गेले. असा बुद्धीअगम्य पालट केवळ गुरूंच्या संकल्पानेच होऊ शकतो. श्री. अनिल यांच्या या उदाहरणातून शिकून ‘आपली योग्य वेळ आली की, गुरु आपला उद्धार करणारच आहेत’, यावर आपण श्रद्धा ठेवून साधनेचे सतत प्रयत्न करत रहावे.’ |
३. ‘श्री. अनिल देवाचे नामही घेऊ न शकणे आणि पुढे ते पूर्णवेळ साधना करणे’, हा टप्पा देवाने त्यांच्याकडून ३ दिवसांत पूर्ण करून घेणे
आश्रमात आल्यावर त्याची शारीरिक स्थिती दोनच दिवसांत स्थिरावली. त्यानंतर त्याच्या त्रासासाठी सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांना नामजपादी उपाय विचारले. पू. गडकरीकाकांनी त्याला प्रतिदिन ५ घंटे नामजप करायला सांगितला. प्रत्यक्षात घरी असतांना श्री. अनिल याला ५ मिनिटेही जप करायला जमत नसे. आश्रमात येण्याआधीच्या काही दिवसांपासून तर त्याला देवपूजाही करणे जमत नसे, एवढा त्याला तीव्र त्रास होता. ‘पू. काकांनी सांगितलेला जप तो कसा करणार ?’, असा मला प्रश्न होता; परंतु ‘त्याला प्रथम १५ मिनिटे जप करायला सांगायचे आणि हळूहळू वाढवायला सांगायचा’, असा विचार करून त्याला जपाविषयी सांगितले. प्रत्यक्षात तो पहिल्या दिवसापासून ७ ते ९ घंटे जप करू लागला. साधकांचे त्रास न्यून व्हावेत, यासाठी नामजपादी उपायांना बसणार्या संतांनीही मला सांगितले, ‘श्री. अनिल यांच्यात पुष्कळ भाव आहे.’ असे ३ दिवस उलटल्यावर तो ग्रंथ सेवेत टंकलेखन शिकण्यासाठी जाऊ लागला. त्यानंतर २ दिवस झाल्यावर तो औषधांसंबंधीची सेवा करू लागला. आश्रमात येण्यापूर्वी, ‘देवाचे नामही घेऊ न शकणारा तो पूर्णवेळ साधना करू लागला’, हा टप्पा देवाने त्याच्याकडून ३ दिवसांत पूर्ण करून घेतला.
४. श्री. अनिल यांनी आश्रमातील कार्यपद्धती आणि साधकांच्या प्रकृती यांच्याशी सहज जुळवून घेणे
पूर्णवेळ साधना करायला लागल्यानंतरही तो अनेक वर्षे सेवा करत असल्याप्रमाणे सेवेत आणि आश्रमात लगेच रुळला. त्याला आश्रमातील कार्यपद्धती, साधकांच्या वेगवेगळ्या प्रकृती यांविषयी काहीच संघर्ष झाला नाही. आश्रमजीवन तो सहज स्वीकारू शकला. ‘आश्रमातील साधकांना औषधे बाहेरून विकत आणून देणे’, ही सेवा तो पुष्कळ मन लावून आणि प्रेमाने करतो. असा आमूलाग्र पालट कुणीही व्यक्ती स्वतः करू शकत नाही. हे केवळ गुरुकृपेनेच साध्य होऊ शकते.’
– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी दुर्गेश सामंत (श्री. अनिल सामंत यांची बहीण), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.२.२०२२)
|