काँग्रेस पक्ष तृणमूल काँग्रेस पक्षात विलीन करण्याची हीच योग्य वेळ ! – तृणमूल काँग्रेस

हिंदूंच्या दृष्टीने हे दोन्ही हिंदुद्वेषी असल्याने त्यांचा राजकीयदृष्ट्या अस्त होणेच योग्य आहे ! – संपादक

डावीकडून राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हाकिम

नवी देहली – पाच राज्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. एकाही राज्यात काँग्रेसची सत्ता येऊ शकली नाही. काँग्रेससारख्या जुन्या पक्षाचे असे का होत आहे ?, ते कळत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष आता तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन केला पाहिजे. त्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असे विधान तृणमूल काँग्रेसचे बंगालमधील मंत्री फिरहाद हाकिम यांनी केले. असे झाल्यास ‘आपण महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्या सिद्धांतांच्या आधारे नथुराम गोडसे यांच्या सिद्धांतांविरुद्ध लढा देऊ शकू’, असेही सांगितले. (याद्वारे फिरहाद हाकिम हे अप्रत्यक्षपणे हिंदूंविरुद्ध चिथावणी देत आहेत, असेच म्हणावे लागेल ! – संपादक)

१. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले की, आम्ही बर्‍याच वर्षांपासून सांगत आहोत की, भाजपासारख्या पक्षाविरुद्ध काँग्रेस एकटी लढू शकत नाही. भाजपच्या विरोधात लढण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्यांची आवश्यकता आहे. काँग्रेसला हे आता तरी समजायला हवे.

२. ‘भाजपच्या विरोधात विरोधकांची शक्तीशाली आघाडी सिद्ध करण्याऐवजी काँग्रेसी टि्वटरपुरती मर्यादित राहिली आहे’, असा आरोप यापूर्वी तृणमूलचे मुखपत्र असणार्‍या ‘जागो बांग्ला’ या वृत्तपत्रातून करण्यात आला होता.

तृणमूल काँग्रेस पक्ष भाजपचा सर्वांत मोठा दलाल ! – काँग्रेस

तृणमूल काँग्रेसकडून आलेल्या विलिनीकरणाच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना बंगालचे काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी म्हणाले की, तृणमूल काँग्रेस पक्ष हा  भाजपचा सर्वांत मोठा दलाल आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते भाजपच्या विरोधात लढण्याचा गांभीर्याने विचार करत असतील, तर तृणमूल काँग्रेस पक्षच काँग्रेसमध्ये विलीन केला पाहिजे.