सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे यांच्या कथ्थक नृत्याच्या प्रयोगांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे यांच्या कथ्थक नृत्याच्या प्रयोगांचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘दादर, मुंबई येथील सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात ४.१.२०२२ आणि ५.१.२०२२ या दिवशी कथ्थक नृत्यातील अनेक प्रकार सादर केले. या नृत्यप्रकारांचा अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असणारे आणि नसणारे अशा दोन प्रकारच्या साधकांच्या गटांवर प्रयोग करण्यात आला. देवाच्या कृपेने माझ्याकडून कथ्थक नृत्य प्रयोगाच्या झालेल्या सूक्ष्म परीक्षणातील काही सूत्रे येथे दिली आहेत.

१०.३.२०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात सौ. सोनियाताई यांनी नृत्यप्रयोगाचा आरंभ ‘कस्तुरी तिलकं…’ या श्लोकावर आधारित श्रीकृष्ण वंदनेने करणे आणि त्यांनी पंचम सवारी या सहसा पखवाजावर वाजवल्या जाणार्‍या खुल्या बोलांच्या अनवट (प्रचलित नसलेल्या) तालावर नृत्य करणे ही सूत्रे वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत. 

आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/559892.html

सौ. सोनिया परचुरे

३. भावपक्षामध्ये (टीप १) विविध भूमिका करून केलेले नृत्य

टीप १ – भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींचा भावपक्ष म्हणजे, नृत्यातील नाट्य. नृत्याचा असा भाग ज्यात नृत्यातील हालचालींसह निरनिराळ्या भावभावना व्यक्त केल्या जातात. त्यात प्रेक्षकांपर्यंत नृत्य, कथानक यांतील आनंद पोचवण्याची क्षमता असते. तसेच तो बोधप्रदही (प्रबोधन करणारा) असतो. तो नृत्याचा ‘भावपक्ष’ होय.

आध्यात्मिक संशोधन केंद्रात नृत्य सादर करताना सौ. सोनिया परचुरे

३  अ. संत सूरदास यांनी रचलेल्या ‘राधे तेरो बदन बिराजत…’ या भजनावर कथ्थक नृत्य सादर करणे : या बंदिशीवर सौ. सोनियाताईंचे नृत्य पहात असतांना वृंदावनाचे सुंदर दृश्य डोळ्यांसमोर उभे राहिले. ‘राधा श्रीकृष्णाचा शोध घेत असतांना व्याकुळ होऊन त्याला सर्वत्र शोधत होती आणि श्रीकृष्णाला आर्ततेने आळवत होती’, हा अभिनय सौ. सोनियाताईंनी अत्यंत सुंदररित्या केला. त्यामुळे त्यांचे हे नृत्य पाहून माझ्या मनात श्रीकृष्णाप्रतीचा आर्तभाव आणि श्रीकृष्णाचे तत्त्व अनुभवण्याची व्याकुळतारूपी तळमळ जागृत झाली. या बंदिशीवर (टीप २)   सादर केलेल्या नृत्यातून वृंदावनाचे वर्णन करणारे भाव पाहून शृंगाररस आणि राधेच्या मनोदशेचे वर्णन करणारे भाव पाहून करुणरस या दोन्ही रसांची संमिश्र अनुभूती आली.

(टीप २ – बंदिशी म्हणजे शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. ही मध्यलय किंवा द्रुतलयीत गातात.)

३ आ.‘खंडित नायिका आणि राधिका’ (राधाकृष्ण छेडछाड) सादर करणे : त्यानंतर त्यांनी भावपक्षामध्ये नायिका हा नृत्यप्रकार सादर केला. त्यात त्यांनी खंडित नायिका आणि राधिका नायिका सादर केल्या.

कु. मधुरा भोसले

३ आ १. खंडित नायिका : नायिकेच्या प्रियकराने व्यभिचार केल्यामुळे तिचा मानभंग झाला असून त्यानंतरची तिची स्थिती आणि तिच्या मनातील विविध भावना नृत्यातील हस्तमुद्रा, पदन्यास आणि मुखावरील भाव यांतून सौ. सोनियाताईंनी हुबेहुब दाखवला. तेव्हा खंडित नायिकेच्या मनातील दुःख आणि वैफल्यग्रस्त भाव सौ. सोनियाताईंच्या मुखावरील भाव अन् त्यांनी ढाळलेले दुःखाचे अश्रू यांतून प्रकट झाला.

३ आ २. राधिका नायिका : या भावपक्षात ‘डगर चलत देखो श्याम नगरिया…’ या बंदिशीवर सौ. सोनियाताईंनी राधा आणि श्रीकृष्ण यांच्या लीलांचे वर्णन केले आहे. तेव्हा श्रीकृष्णामधील खोडकर (नटखट) भाव व्यक्त करत असतांना सौ. सोनियाताईंच्या हस्तमुद्रा, पदन्यास आणि मुखावरील भाव यांतून त्या श्रीकृष्ण असून तो कशा प्रकारे खोड्या करतो, हे त्यांच्या हालचाली अन् मुखावरील खोडकर भाव यांतून दिसून आले. तेव्हा गोकुळातील श्रीकृष्ण, राधा आणि गोपी यांच्या लीला पहाण्याचा आनंदच जणू आम्ही अनुभवला.

३ इ. ‘नायिका’ या नृत्यप्रकाराच्या वेळी जाणवलेली अन्य सूत्रे

३ इ १. ‘नायिका’ या नृत्य प्रकारात सौ. सोनियाताईंनी पायात घुंगरू न बांधल्यामुळे झालेला परिणाम :‘नायिका’ हा नृत्यप्रकार सादर करतांना सौ. सोनियाताईंनी पायामध्ये घुंगरू बांधले नव्हते. त्यामुळे प्रेक्षक साधकांचे लक्ष सौ. सोनियाताईंच्या मुखावरील हावभाव आणि त्याला अनुसरून असलेल्या हस्तमुद्रा, पदन्यास अन् देह संचालन यांच्याकडे जात होते.

३ इ १ अ. सौ. सोनियाताईंनी घुंगरू बांधून आणि घुंगरू न बांधता कथ्थक नृत्य करणे

३ इ २. सौ. सोनियाताईंनी नृत्यातून केलेल्या दोन्ही नायिकांच्या भूमिका या एकपात्री प्रयोगापेक्षा अधिक परिणामकारक असल्याचे जाणवणे : सौ. सोनियाताई या अभिनयही शिकलेल्या आहेत. त्या नाटक, सिनेमा यांमध्ये काम करत असल्याने नृत्य आणि अभिनय या दोन्हींचा संगम त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे पहाण्यास मिळाला.  त्यामुळे त्यांनी कथ्थक नृत्यातून सादर केलेल्या दोन्ही प्रकारच्या नायिकांच्या भूमिका आणि मुखावरील हावभाव हे या नाटकातील एकपात्री प्रयोगापेक्षा अधिक परिणामकारक असल्याचे जाणवले.

(क्रमशः उद्याच्या दैनिकात)

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक