सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे यांच्या कथ्थक नृत्याच्या प्रयोगांचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘दादर, मुंबई येथील सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात ४.१.२०२२ आणि ५.१.२०२२ या दिवशी कथ्थक नृत्यातील अनेक प्रकार सादर केले. या नृत्यप्रकारांचा अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असणारे आणि नसणारे अशा दोन प्रकारच्या साधकांच्या गटावर प्रयोग करण्यात आला. देवाच्या कृपेने माझ्याकडून कथ्थक नृत्य प्रयोगाच्या झालेल्या सूक्ष्म परीक्षणातील काही सूत्रे येथे दिली आहेत.
४.१.२०२२
४.१.२०२२ या दिवशी सौ. सोनियाताई यांनी कथ्थक नृत्याचे पुढील प्रकार सादर केले.
१. आरंभी श्रीकृष्णाची वंदना करून नृत्याचा आरंभ करणे
२. नंतर तालपक्षात (नृत्त भागात (टीप १)) ‘पंचम सवारी’ या सहसा पखवाजावर वाजवल्या जाणार्या खुल्या बोलांच्या अनवट (प्रचलित नसलेल्या) तालावर कथ्थक नृत्यातील थाट, तोडे, प्रिमलू इत्यादी विविध प्रकारांच्या काही रचना सादर केल्या.
टीप १ – नर्तनाचे नृत्त, नाट्य आणि नृत्य असे तीन प्रकार आहेत. नृत्यशैलींचा तालपक्ष म्हणजे त्यातील नृत्त. नृत्ताला कथानक नसते. त्यात केवळ पदन्यास, हस्तमुद्रा, चारी (पदन्यासाच्या मुख्य चार स्थितींपैकी एक) इत्यादी प्रकारांनी मृदंगाच्या बोलांच्या अनुषंगाने ताल-लय यांच्याशी समन्वय साधत शारीरिक हालचाली केल्या जातात. नृत्ताचे ताल-लय हे वैशिष्ट्य आहे.
३. शेवटी भावपक्षात (टीप २)
अ. संत सूरदासजी यांच्या भजनावर नृत्य केले.
आ. खंडित नायिका आणि राधिका (राधाकृष्ण छेडछाड) कथ्थक नृत्यातून प्रस्तुत केल्या.
इ. पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातील ‘जय जय रामकृष्ण हरि’ या नामाच्या गजरावर कथ्थक नृत्य केले.
टीप २ – भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींचा भावपक्ष म्हणजे, नृत्यातील नाट्य. नृत्याचा असा भाग ज्यात नृत्यातील हालचालींसह निरनिराळ्या भावभावना व्यक्त केल्या जातात. त्यात प्रेक्षकांपर्यंत नृत्य, कथानक यांतील आनंद पोचवण्याची क्षमता असते. तसेच तो बोधप्रदही (प्रबोधन करणारा) असतो. तो नृत्याचा ‘भावपक्ष’ होय.
१. सौ. सोनियाताई यांनी नृत्यप्रयोगाचा आरंभ ‘कस्तुरी तिलकं…’ या श्लोकावर आधारित श्रीकृष्ण वंदनेने करणे
सौ. सोनियाताईंनी नृत्यप्रयोगाचा आरंभ ‘कस्तुरी तिलकं’ या श्लोकावर कथ्थक नृत्य सादर करून श्रीकृष्णवंदना केली. तेव्हा त्यांच्यामध्ये श्रीकृष्णाप्रतीचा भाव जागृत होऊन त्यांनी नृत्यातून केलेले हावभाव, हस्तमुद्रा आणि पदन्यास यांतून भावपूर्ण नृत्य सादर केले. तेव्हा ‘त्या श्रीकृष्णाच्या भक्त असून त्या अर्चनभक्तीद्वारे (टीप) श्रीकृष्णाची आराधना करत आहेत’, हे प्रत्यक्ष दृश्य माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिले आणि मला त्यांतील भक्तीरस अनुभवता आला. हे भावनृत्य करत असतांना सौ. सोनियाताईंच्या अनाहतचक्रामध्ये भाव जागृत झाल्यामुळे भावाच्या आपतत्त्वमय निळसर रंगाच्या लहरी त्यांच्या देहात पसरल्या. त्यामुळे त्यांची सप्तकुंडलिनीचक्रे आणि सर्व कुंडलिनीनाड्या यांची शुद्धी झाली. त्याचप्रमाणे त्यांच्या देहातून सूक्ष्म स्तरावर प्रक्षेपित झालेल्या या भावलहरींमुळे नृत्याच्या प्रयोगाला उपस्थित असणार्या साधकांच्या स्थूल आणि सूक्ष्म देहांवरील त्रासदायक काळ्या शक्तीचे आवरण दूर झाले. या भावलहरींचा आल्हाददायक स्पर्श प्रेक्षक साधकांच्या अनाहतचक्राला झाल्यामुळे त्यांचे अनाहतचक्र जागृत होऊन त्यांच्या हृदयातील श्रीकृष्णाप्रतीचा भाव जागृत झाला.
टीप – ‘श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन’, या नवविधाभक्तींमध्ये पाचव्या क्रमांकाची भक्ती ‘अर्चनभक्ती’ आहे. या भक्तीमध्ये प्रत्यक्ष किंवा मानसदृष्ट्या भगवंताची भक्ती पंचोपचारे किंवा षोडशोपचारे केली जाते.
१ अ. नृत्य प्रयोगाला उपस्थित असणार्या साधकांचा भाव जागृत होण्यामागील विविध घटकांचे योगदान
टीप – वरील सारणीवरून ‘नर्तकाने भावपूर्ण नृत्य केल्यामुळे नर्तक आणि प्रेक्षक यांचा भाव जागृत होतो’, हे सूत्र शिकायला मिळाले. त्याचबरोबर नृत्यामुळे कलाकार आणि श्रोते यांची भावजागृती होण्यासाठी नृत्याचे पार्श्वसंगीत नृत्याशी अनुरूप असेल, तर नर्तक आणि श्रोते यांच्यावर संगीतातून आकाश अन् नृत्यातून वायू या तत्त्वांच्या स्तरावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाले. यातून त्यांना नृत्य आणि संगीत यांच्याशी लवकर एकरूप होता येते. त्यामुळे नर्तक आणि श्रोते यांच्या मनात नृत्य अन् संगीत यांच्या आशयाप्रमाणे विविध प्रकारचे भाव उमटून ते अनुभवता येतात.
२. सौ. सोनियाताई यांनी पंचम सवारी या सहसा पखवाजावर वाजवल्या जाणार्या खुल्या बोलांच्या अनवट (प्रचलित नसलेल्या) तालावर नृत्य करणे
२ अ. सौ. सोनियाताई यांनी पंचम सवारी या तालामध्ये विविध बंदिशींवर नृत्य केल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे
२ आ. नैसर्गिक आवाजांवर आधारित ‘परमेलू’ (प्रिमलू) हा नृत्यप्रकार सादर करणे : कथ्थक नृत्याच्या या प्रकारामध्ये निसर्गातील विविध आवाजांशी, उदा. पशूपक्षी, वाद्ये इत्यादींच्या आवाजांशी साम्य असणार्या नृत्याच्या कुकू, झंग, झांगिर इत्यादी बोलांवर आधारित नृत्य केले जाते. सौ. सोनियाताईंनी ‘कुकू’ या बोलावर नृत्यातील हालचाली केल्यावर प्रत्यक्ष कोकिळेचा स्वर ऐकत असल्याचे जाणवले. तेव्हा मनाला शुद्ध नादब्रह्माची अनुभूती येऊन आनंद जाणवला. निसर्गामध्ये सात्त्विकता अधिक असल्यामुळे कृत्रिम नादांच्या तुलनेत नैसर्गिक नादांतून अधिक प्रमाणात सात्त्विकता प्रक्षेपित झाल्यामुळे कृत्रिम नादांच्या तुलनेत नैसर्गिक नाद ऐकत असतांना आनंदाची अनुभूती अधिक प्रमाणात येते.
२ इ. पंचम सवारी ऐकत असतांना आनंदाची अनुभूती सर्वाधिक प्रमाणात येणे
२ इ १. ‘पंचम सवारी’ या अनवट तालातून कार्यरत झालेल्या घटकांचे प्रमाण
टीप – ‘सतार’ हे तंतू वाद्य असल्यामुळे त्याच्याकडे ईश्वराचे सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्य अधिक प्रमाणात आकृष्ट होते. त्यामुळे सतारीचा नाद अत्यंत सुमधुर आणि कर्णप्रिय असतो. हा नाद ऐकत असतांना चैतन्य जाणवून मनाचा उत्साह वाढला आणि प्रामुख्याने आनंदाची अनुभूती आली.
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१.२०२२)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |