राज्यातील मंत्र्यांना अडकवण्याचा प्रयत्न; अधिवेशन संपण्यापूर्वी ‘पेनड्राईव्ह’ देणार ! – शशिकांत शिंदे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्यापर्यंत महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा खालावल्याविषयी व्यक्त केली खंत

जनतेने निवडून दिलेल्या एका लोकप्रतिनिधीनेच लोकशाहीची वस्तुस्थिती मांडून लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. अशी लोकशाही जनतेचे हित कसे साधणार ? – संपादक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – राज्यातील काही मंत्र्यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विधीमंडळाचे अधिवेशन संपायच्या आधी याविषयीचा ‘पेनड्राईव्ह’ मी सभागृहात सादर करीन, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी केले. ८ मार्च या दिवशी विधान परिषदेत कायदा आणि सुव्यवस्था यांविषयी ते बोलत होते. प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्यापर्यंत महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा खालावला असल्याची खंत या वेळी शिंदे यांनी व्यक्त केली.

या वेळी शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘मी जो ‘पेनड्राईव्ह’ सादर करणार आहे, त्यातून अनेकांची नावे बाहेर पडतील. न्यायालयात याचिका करणार्‍या एका व्यक्तीला मंत्रालयाच्या बाहेर विष पिऊन आत्महत्या करण्याची वेळ आणण्यात आली. विष प्राशन केल्यानंतर ‘ती व्यक्ती मेली कि नाही’, हे पहाण्यासाठी यंत्रणाही लावण्यात आली होती. ही सर्व माहिती मी उघड करणार आहे. एखाद्याला चौकशीत अडकवून न्यायालयात निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत त्याला अग्नीपरीक्षा द्यावी लागत आहे. राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आरोप केले जात आहेत. राजकीय नेते प्रशासन आणि पोलीस यांचा वापर करत आहेत. त्यामुळे जनतेचा या सर्वांवरील विश्‍वास उडत आहे.’’