विधानसभा प्रश्नोत्तरे…
मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – भायखळा येथील जे.जे. रुग्णालयातील अनुसूचित जाती-जमातीतील सफाई कामगारांना वारसा हक्काने देण्यात येणार्या नियुक्त्या वर्ष २०१४ पासून प्रलंबित आहेत. हे प्रकरण अंतिम टप्प्यामध्ये आहे. लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार सामाजिक न्याय विभागाने निर्देश दिल्यानंतर पुढील सप्ताहामध्ये त्या ५८ बाधित उमेदवारांना कायमस्वरूपी शासकीय सेवेमध्ये घेण्याचा अंतिम आदेश देऊ, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी ९ मार्च या दिवशी विधानसभेच्या प्रश्नोत्तरात सांगितले. आमदार अमिन पटेल यांनी हा प्रश्न विचारला होता.
या वेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, जे.जे. रुग्णालयातील, तसेच राज्यातील सर्वच ठिकाणी वर्ष २०१८ मध्ये तत्कालीन मुख्य सचिवांनी घेतलेल्या लाड-पागे समितीनुसार सफाई कामगारांमध्ये केवळ ‘नवबौद्ध’ यांना वारसा हक्काने नोकरी दिली जाईल. यामध्ये पालट करून सर्वच जाती आणि धर्म यांतील सफाई कामगारांना सेवेत घेतले जाईल, असा निर्णय लवकरच घोषित करू. साहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी यांचा संप चालू आहे. त्यांच्या मागण्यांपैकी ८० टक्के मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. तरी त्यांनी संप मागे घ्यावा.
साहाय्यक प्राध्यापक यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेमध्ये घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या काही निर्णयांमुळे सरकार असमर्थ आहे, तर वैद्यकीय अधिकारी यांच्याविषयी शासन स्तरावर चर्चा चालू आहे. ४२ वर्षांपूर्वी लाड-पागे समितीने काही शिफारशीं केल्या आहेत. मुळात ही समिती आणि त्यांच्या शिफारशी कालबाह्य झाल्या आहेत. आता लाड-पागे समितीच्या शिफारशींवर पुन्हा नव्याने विचार करण्याची आवश्यकता असून त्या संदर्भात लवकरच एक समिती नेमण्याचा सरकार विचार करत आहे, असे मुंडे यांनी सांगितले.