उंचगावातील (जिल्हा कोल्हापूर) डॉक्टर आणि परिचारिका यांचा करवीर शिवसेनेच्या वतीने सन्मान !

उंचगाव येथे करवीर शिवसेनेच्या वतीने महिलांचा सन्मान केल्यावर एकत्र जमलेल्या आधुनिक वैद्या आणि परिचारिका

कोल्हापूर, ८ मार्च (वार्ता.) – कोरोना महामारीच्या काळामध्ये जीव धोक्यात घालून करवीर तालुक्यातील उंचगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला आधुनिक वैद्या आणि परिचारिका यांनी कोरोना लसीकरणाचा लाखाचा टप्पा पूर्ण केला. त्याविषयी करवीर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिलादिनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि फेटा देऊन त्यांच्या सेवेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी महिला आघाडीच्या सौ. स्वाती यादव म्हणाल्या, ‘‘डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात येणार्‍या प्रत्येक रुग्णाला धोका पत्करून कोरोना काळात अनमोल सेवा दिली. ज्या जिजाऊंनी संस्काराच्या शिदोरीतून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले, त्या जिजाऊमातेच्या पाऊलखुणा जपत महिलांनी संस्कारातून भारत सामर्थ्यशाली बनवावा.’’
या वेळी डॉ. बर्गे, डॉ. पाटील, परिचारिका समुद्रे आणि कुरणे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, ग्रामपंचायत सदस्या अर्चना करी, स्वाती जाधव, जयश्री रेडेकर, रूपाली स्वामी, छाया घोरपडे, मीना पवार, महादेवी स्वामी, सुनंदा चौगुले यांसह अन्य उपस्थित होते.