मडगाव (गोवा) येथील कै. (श्रीमती) उपदेश आनंद यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

८.३.२०२२ या दिवशी श्रीमती उपदेश आनंद यांच्या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…

२४.२.२०२२ या दिवशी मडगाव (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उपदेश आनंद (वय ७८ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या मुलींना त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कै. (श्रीमती) उपदेश आनंद

सुश्री (कु.) दीपिका आनंद (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) (थोरली मुलगी), गोवा

सुश्री (कु.) दीपिका आनंद

१. निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१ अ. बोलणे न्यून होऊन अखंड नामजप करणे आणि सतत परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवल्याने आनंदावस्थेत असल्याचे जाणवणे : ‘१८.२.२०२२ या दिवशी आईला रुग्णालयात भरती केले होते. तेव्हापासून तिच्या प्रकृतीत चढउतार होत होते; परंतु तिचा नामजप पुष्कळ चांगला चालू होता. २० आणि २१.२.२०२२ या दिवशी ती थोडेफार बोलत होती; परंतु २२.२.२०२० या दिवशी तिचे बोलणे न्यून झाले आणि तिचा अखंड नामजपच चालू होता. ती भिंतीकडे एकटक पहात होती. मी तिला याविषयी विचारले, तर ती म्हणायची, ‘‘गुरुदेव उभे आहेत. मी त्यांच्याकडे पहात आहे.’’ तेव्हा तिच्या तोंडवळ्यावर तेज, भाव आणि वेगळाच आनंद जाणवत होता. संपूर्ण खोलीतील स्पंदने पुष्कळ चांगली असल्याचे मला जाणवत होते. माझाही नामजप पुष्कळ चांगला होत होता.

१ आ. आईच्या निधनप्रसंगी खोलीत चैतन्य आणि प्रकाश जाणवणे : २४.२.२०२२ या दिवशी आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘आता त्या गाढ निद्रेत गेल्या आहेत.’’ तो गुरुवारचा दिवस होता. ‘खोलीतील वातावरण अधिक चैतन्यमय झाले आहे आणि आई प्रत्यक्षात तेथे नाहीच. ती निघून गेली आहे आणि केवळ तिचा श्वास चालू आहे’, असे मला तेथे अनुभवायला येत होते. मला खोलीत पुष्कळ चैतन्य आणि प्रकाश जाणवत होता. ‘तेथे कुणी आजारी आहे’, असे मला वाटत नव्हते.

२. आईचे निधन

२ अ. आईने शेवटचा श्वास सहजतेने घेणे आणि तिला कसलाही त्रास न होणे : आईने शेवटचा श्वास २४.२.२०२२ या दिवशी रात्री ९.४२ वाजता घेतला. तिने शेवटचा श्वास एवढ्या सहजतेने घेतला की, असे वाटलेच नाही की, हा तिचा शेवटचा श्वास असेल. आपण जसे जागृत अवस्थेतून निद्रेत सहजतेने जातो, अगदी तसेच तिचे झाले. तिच्या शरिराची काहीच हालचाल होत नव्हती. तिच्या कपाळावर आठ्या नव्हत्या. तिचा तोंडवळा जसा होता, तसाच होता. तिच्या निधनानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी दिलेले तुळशीपत्र आम्ही तिच्या ओठांवर ठेवले.

२ आ. ‘भक्त ईश्वराला कसा भेटतो ?’, हे आईच्या मृत्यूच्या क्षणाचे साक्षीदार बनून अनुभवायला मिळणे : आईच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तिच्या समवेत होते. तिचा मृत्यू झाल्यावर मला असे वाटत नव्हते की, त्या खोलीत कुणाचा तरी मृत्यू झाला आहे. आधुनिक वैद्यांनी येऊन तपासणी केली आणि मला सांगितले, ‘‘त्या आता या जगात राहिल्या नाहीत.’’ मला त्या पूर्वीच ठाऊक झाले की, तिचा श्वासोच्छ्वास बंद झाला आहे. मी पुष्कळ कृतज्ञ आहे की, ईश्वराने मला या सुंदर क्षणाचे साक्षीदार बनवले. मला ही अनुभूती दिली. ‘भरतभेटी’विषयी ऐकले होते; परंतु ‘एक भक्त ईश्वराला कसा भेटतो ?’, हे प्रत्यक्षात पहाण्याची संधी मिळाली. मी पुष्कळ भाग्यशाली आहे.

३. निधनानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

३ अ. आईचे निधन झाल्यावर तिच्या ताेंडवळ्यावर तेज आणि प्रकाश होता. तिच्या तोंडवळ्यावर समाधान आणि आनंद जाणवत होता.

३ आ. आईचे शरीर तिच्या मृत्यूनंतर १२ घंट्यांनंतरही मऊ आणि लवचिक होते. तेव्हा मला वाटत होते, ‘आई केव्हाही उठून बसेल.’

सौ. शौर्या सुनील मेहता (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) (धाकटी मुलगी), गोवा

सौ. शौर्या सुनील मेहता

१. निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१ अ. ‘आपली सेवा करण्यात मुलींचा वेळ जायला नको’, यासाठी आजारपणात स्वतःचे स्वतः करण्याचा प्रयत्न करणे : ‘आईला ‘लिव्हर सिर्‍होसिस (Liver cirrhosis)’ हा आजार होता. मागील २ वर्षांपासून तिचे आजारपण वाढले होते, तरीही ती जेवढे शक्य होईल तेवढे स्वतःचे स्वतः करण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा अगदीच आवश्यकता वाटत असेल, तेव्हाच ती आमचे साहाय्य घेत होती. ‘आम्हा दोघींचा (सुश्री (कु.) दीपिका आनंद आणि सौ. शौर्या सुनील मेहता यांचा) सेवेचा वेळ तिची सेवा करण्यात जायला नको’, असे तिला पुष्कळ वाटत असे.

१ आ. रुग्णालयात भरती होतांना आनंदी असणे आणि ‘आता मी गुरुदेवांच्या चरणी जाणार आहे’, असे सांगून स्वतःच्या मृत्यूची पूर्वकल्पना देणे : मागील २ वर्षांपासून आईला ५ – ६ वेळा रुग्णालयात भरती करावे लागले होते. प्रत्येक वेळी तिला तिच्या प्रकृतीविषयी काळजी आणि भीती वाटत असे; परंतु १८.२.२०२२ या दिवशी रुग्णालयात भरती केल्यावर आई अत्यंत निश्चिंत अन् आनंदी दिसत होती. रात्री आम्ही जेव्हा तिला रुग्णालयात घेऊन आलो, तेव्हा तिची शुद्ध हरपली होती. सकाळी ती आनंदाने म्हणू लागली, ‘‘मी आता वर जाणार आहे’’ आणि मला विचारू लागली, ‘‘वर कोण आहे ?’’ नंतर तिने स्वतःच म्हटले, ‘‘वर गुरुदेव आहेत आणि मी त्यांच्या चरणी जात आहे.’’ तेव्हा मला समजले, ‘तिची जाण्याची वेळ निकट आली आहे.’

१ इ. ‘आईचा मृत्यू रुग्णालयाऐवजी घरी किंवा आश्रमात व्हायला हवा’, असा विचार येऊन काळजी वाटणे आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘तू निश्चिंत रहा’, असे सांगितल्यावर मन शांत अन् स्थिर होणे : आधुनिक वैद्यांच्या सांगण्यावरून आम्ही आईला रुग्णालयात ठेवले होते. आईच्या मृत्यूच्या आधी ३ दिवस माझ्या मनात पुढील काळजीचे विचार होते, ‘रुग्णालयाच्या वातावरणात आईचा मृत्यू झाला, तर आईच्या लिंगदेहाला त्रास होऊ शकतो. आई घरी किंवा आश्रमात असती, तर किती चांगले झाले असते ! तिचा मृत्यू शांतपणे व्हायला पाहिजे. तिला अधिक त्रास होता कामा नये.’ मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना माझ्या मनातील विचार सांगितले. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘तुझी आई शिष्या आहे. गुरूंनी एखाद्याला शिष्य मानल्यावर ते त्याचा हात कधीच सोडत नाहीत. त्या शिष्याचा मृत्यू रुग्णालयात, घरात किंवा विदेशात होवो, त्याचे पुढील नियोजन गुरुच करतात. तू निश्चिंत रहा.’’ त्यानंतर माझे मन शांत आणि स्थिर झाले.

२. निधनानंतर जाणवलेले सूत्र

आईचे पार्थिव रुग्णालयातून घरी आणल्यावर आरंभी दाब जाणवणे आणि नंतर हलकेपणा अन् चैतन्य जाणवणे : आईचे पार्थिव रुग्णालयातून घरी आणल्यावर घरातील वातावरणात दाब जाणवत होता; परंतु नंतर १५ – २० मिनिटांतच वातावरणात हलकेपणा जाणवला. वातावरण चैतन्यमय झाले आणि शांत वाटू लागले.’

श्री. सुनील मेहता (जावई), गोवा

श्री. सुनील मेहता

१. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सासूबाईंसाठी नामजप करणे’, हा आनंदमय अनुभव असल्याचे जाणवणे

‘२४.२.२०२२ या दिवशी आई (माझ्या सासूबाई श्रीमती उपदेश आनंद) यांनी अंतिम श्वास घेण्यापूर्वी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यांच्यासाठी नामजप केला. ‘हा त्यांच्यासाठी एक अद्भुत आणि आनंदमय अनुभव होता’, असे मला वाटले.

२. निधनानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२ अ. जाणवलेली सूत्रे

१. २४.२.२०२२ या दिवशी मला आकाशात आईंचा तोंडवळा दिसत होता. ‘त्या आनंदाने माझ्याकडे पहात हसत आहेत आणि प्रत्येक गोष्टीसाठी ‘कृतज्ञता’, असे म्हणत आहेत’, असे मला जाणवले. त्यांना पुष्कळ हलकेपणा जाणवत असून त्या मुक्ती अनुभवत होत्या.

२. त्यांचे पार्थिव संपूर्ण रात्रभर घरातच होते; परंतु घरात कसलाही त्रास जाणवत नव्हता.

३. २५.२.२०२२ या दिवशी ‘अंतिम दर्शन घेणे आणि अंत्यसंस्काराची सेवा करणे’, यांसाठी आलेल्या सर्व साधकांना पाहून मला भरून आले होते. तेव्हा मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार कृतज्ञता वाटली.

४. अंत्य संस्काराच्या वेळी कोणत्याही विधीचा कसलाही त्रास जाणवला नाही. ‘जणूकाही हा एखादा उत्सवच आहे’, असे मला वाटत होते.

२ आ. आलेली अनुभूती – सासूबाईंच्या इच्छेप्रमाणे गोकर्ण येथील समुद्रात अस्थिविसर्जन केल्यावर शांतीची अनुभूती येणे आणि समाधान वाटणे : २३.२.२०२२ या दिवशी रात्री आम्ही आईंना भेटायला रुग्णालयात गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला पहाताच हसून आनंद व्यक्त केला. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘अरे, माझा मुलगा आला आहे.’’ नंतर त्या म्हणू लागल्या, ‘‘तुम्हाला समुद्रस्नान करावे लागेल. स्नान केल्यानंतर तुम्ही शुद्ध व्हाल.’’ ‘त्या काय सांगण्याचा प्रयत्न करत होत्या ?’, हे मला त्यांचा अंत्य संस्कार झाल्यानंतर लक्षात आले. आम्ही प्रथम हरवळे (गोवा) येथे अस्थिविसर्जन करण्याचा विचार केला होता; परंतु नंतर माझ्या मनात विचार आला, ‘आई समुद्राविषयी सांगत होत्या आणि हरवळे येथे समुद्र नाही. शौर्याच्या (पत्नीच्या) वडिलांचे अस्थिविसर्जन गोकर्ण येथील समुद्रात केले होते, तर तिच्या आईंचे अस्थिविसर्जनही तेथेच करूया.’ त्यांनी जाण्यापूर्वी त्यांची इच्छा माझ्याकडे व्यक्त केली होती. त्यामुळे मी गोकर्ण येथे जाऊन तेथील समुद्रात त्यांचे अस्थिविसर्जन केले. ही सेवा केल्यावर मला शांतीची अनुभूती आली आणि समाधान वाटले.’

श्रीमती जया घई (लहान बहीण), मैहर, मध्यप्रदेश.

बहिणीच्या समवेत रुग्णालयात असतांना आलेल्या अनुभूती

१. ‘रुग्णालयात दीदीच्या जवळ (श्रीमती उपदेश आनंद यांच्याजवळ) बसून नामजप करतांना मला पुष्कळ प्रकाश दिसत होता.

२. ‘दीदीचे आज्ञाचक्र जागृत आहे’, असे मला दिसत होते. त्या वेळी मला वैष्णोदेवी आणि राधाकृष्ण यांचे दर्शन झाले.’

कु. यदुवीर मेहता (नातू, आध्यात्मिक पातळी ५३ टक्के, वय १६ वर्षे), मडगाव, गोवा.

कु. यदुवीर सुनील मेहता

‘२४.२.२०२२ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आजीला भेटायला रुग्णालयात आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी आजीच्या खोलीत प्रवेश करण्याच्या १० मिनिटे आधीपासूनच खोलीच्या बाहेर दैवी सुगंध येत होता आणि आजीचे निधन झाल्यावर तो सुगंध आणखी वाढला.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २.३.२०२२)

कै. (श्रीमती) उपदेश आनंद यांच्या मृत्यूपासून दहनापर्यंत १५ घंट्यांचा कालावधी शुभ असणे

‘एखाद्याचा मृत्यू झाल्यावर किंवा त्याच्या दहनाच्या वेळेपर्यंत पंचक आदी दोष लागल्यावर त्याची शांती करावी लागते; मात्र ‘आनंदकाकूंच्या मृत्यूपासून दहनापर्यंत १५ घंट्यांचा कालावधी शुभ होता’, हे वैशिष्ट्यपूर्ण होते.’

– श्री. अमर जोशी, पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.३.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक