मुंबई – नवाब मलिक यांना राजकीय हेतूने अटक करण्यात आली आहे. गेली २० वर्षे नवाब मलिक महाराष्ट्राच्या विधानसभेत आहेत. त्या वेळी हे सर्व दिसले नाही. एखादा मुसलमान कार्यकर्ता असला की, त्याला ‘दाऊदचा साथीदार’ म्हटले जाते. तसेच त्याच्यावर कारण नसतांना आरोप केले जात आहेत. मला त्याची चिंता नाही; कारण कधीकाळी माझ्यावरही आरोप झाले होते. हे लोक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले. ‘नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्यांना मंत्रीमंडळातून काढण्याचा निर्णय घेतला नाही. नारायण राणे यांना एक न्याय आणि मलिक यांना दुसरा न्याय लावता. हा सगळा राजकीय हेतूने उद्योग चालला आहे’, असेही पवार म्हणाले.
राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) आर्थिक अपव्यवहाराच्या प्रकरणी अटक केली आहे. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित आस्थापनाच्या समवेत मलिक यांचा संबंध असल्याचा ‘ईडी’चा दावा आहे. (काँग्रेसींकडून अनेकदा निष्पाप हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवले जात असतांना पवार यांनी कधी अशा प्रकारे हिंदूंची बाजू घेतली आहे का ?- संपादक)