आयुर्वेदामुळे ‘केमोथेरपी’च्या दुष्परिणामांत घट होत असल्याचे संशोधनाअंती सिद्ध !

पुण्याच्या वाघोली कर्करोग केंद्राचा केंद्र सरकारसह अमेरिकेतील सरकारकडे पेटंटसाठी अर्ज !

पुणे – येथील वाघोलीच्या कर्करोग केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या कर्करोगांचे रुग्ण उपचारांसाठी येत आहेत. या रुग्णांवर ‘केमोथेरपी’मुळे होणारे विपरित परिणाम अल्प करण्यासाठी आम्ही आयुर्वेदाच्या औषधांचा वापर केला. त्यामुळे दुष्परिणामांची तीव्रता अल्प होत असल्याच्या निदर्शस आले. त्यामुळे त्या औषधांचे वाघोली येथील ‘इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर’ने केंद्र सरकारसह अमेरिकेतील सरकारकडे पेटंटसाठी अर्ज केला आहे, असे या केंद्राचे संस्थापक डॉ. सदानंद सरदेशमुख यांनी सांगितले. वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगांच्या रुग्णांना देण्यात येते असलेल्या ‘केमोथेरपी’मुळे होणार्‍या दुष्परिणामांची (साईड इफेक्टस्ची) तीव्रता अल्प करण्यासाठी आता आयुर्वेदाच्या औषधांची मात्रा उपयुक्त ठरल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे.


डॉ. सदानंद सरदेशमुख यांनी सांगितले की, या केंद्रामध्ये कर्करोगावर अ‍ॅलोपॅथी उपचारांद्वारे कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता; मात्र याचा विपरित परिणाम होत होते. परिणाम अल्प करणे अशक्य होत होते. त्या परिणामांमुळे रुग्णाचे शारीरिक आणि मानसिक हाल होत होते. ‘केमोथेरपी’नंतर होणार्‍या परिणामांची तीव्रता अल्प करण्यासाठी आम्ही आयुर्वेदाची औषधे देण्याचा प्रयोग चालू केला. गेल्या अनेक वर्षांपासून याविषयी संशोधन चालू होते. आतापर्यंत १२ सहस्रांहून अधिक रुग्णांवर संशोधन केले आहे. केमोथेरपीच्या रुग्णांवरील तीव्रता अल्प करण्यासाठी आयुर्वेदातील प्रवाळ भस्म, कामदुधा रस, सुवर्ण भस्म, मौक्तिक भस्म, गुडूची सत्त्व या प्रकारच्या आयुर्वेद औषधांचा वापर केला जात आहे. आयुर्वेदाच्या औषधांमुळे परिणामांची तीव्रता अल्प होत असल्याचे सिद्ध झाले आहे.