वर्षानुवर्षे पडून असलेल्या लाखो टन घनकचर्‍यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणार्‍या महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या विरोधात लवकरच कायदेशीर कारवाई ! – अजित ठाणेकर, भाजप

प्रतिकात्मक चित्र

कोल्हापूर, ४ मार्च (वार्ता.) – कोल्हापूर महापालिकेने विनाप्रक्रिया पडून असलेला लाखो टन कचरा प्रक्रिया प्रकल्पातून हलवला. यानंतर तो शासनाने सूचित केलेल्या अपेक्षित भूमीवर न टाकता शेतात पसरला आणि तो नदीपात्रातून ‘रेड झोन’मध्ये पसरला. या प्रकरणात पर्यावरणाची अतोनात हानी होऊन त्याचा शेतीवर विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे पडून असलेल्या लाखो टन घनकचर्‍यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणार्‍या महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या विरोधात लवकरच कायदेशीर कारवाई करणार आहे, अशी चेतावणी भाजपचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी ३ मार्च या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महेश जाधव, प्रदीप उलपे यांसह अन्य उपस्थित होते.

१. ६ जानेवारीला उघडकीस आणलेल्या या प्रकारानंतर त्याच दिवशी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांसमवेत भेट देऊन भाजपने पंचनामा केला. यानंतर या प्रकरणी नोटीस बजावण्यास प्रदूषण मंडळाने १८ दिवस घेतले. यात झालेला प्रकार महापालिकेने कर्मचार्‍यांवर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे.

२. या सर्व प्रकरणाच्या अन्वेषणासाठी महापालिका प्रशासकांनी नेमलेल्या अन्वेषण समितीला त्यांचा अहवाल सादर करण्यास दीड मास लागला आणि अहवालात अत्यंत गंभीर असलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात अत्यंत जुजबी कारवाई करून विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

३. लाखो टन कचरा विनाप्रक्रिया, विनाअनुमती अशा पद्धतीने हालवण्याच्या मागे भूमी मोकळी केल्याचे भासवून महापालिकेकडून पैसे उकळण्याचा उद्देश असल्याचे दिसते. तरी एकूणच हे प्रकरण गंभीर असून संबंधित ठेकेदार आणि महापालिकेचे उत्तरदायी अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.