मुंबई सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉक्टरांचा प्रत्यक्ष लाभलेला सहवास आणि त्यांच्याकडून मिळालेली शिकवण अन् आलेल्या अनुभूती !

परात्पर गुरु डॉ. आठवले

४ मार्च या दिवशी आपण ‘श्री. अशोक चंद्रकांत जाधव यांचा परात्पर गुरु डॉक्टरांच्या अभ्यासवर्गामुळे नामस्मरणाला झालेला आरंभ ! तसेच अभ्यासवर्गात सांगितल्याप्रमाणे सत्सेवेला केलेला प्रारंभ !’ याविषयीची सूत्रे पाहिली. आज आपण उर्वरित भाग पाहूया.

(भाग २)

भाग १ पहाण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/558001.html


श्री. अशोक जाधव

४. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘ट्रेसिंग’ केलेली अक्षरे पाहून एका अक्षरात फरक असल्याचे सांगणे, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी बहिर्गाेल भिंगातून अक्षरे दाखवल्यावर चूक लक्षात येणे आणि यातून परात्पर गुरु डॉक्टरांची सर्वज्ञता अनुभवायला मिळणे

‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या सार्वजनिक सभांसाठी संस्थेचा धर्मरथ रंगवायचा’, असे ठरले. त्या वेळी ‘धर्मरथावर अध्यात्मशास्त्राला अनुसरून काही सुवचने रंगवून घ्यावीत’, असे ठरले. या सेवेचे दायित्व माझ्याकडे आले. कु. अनुराधा वाडेकर (आताच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर) प्रथम सर्व अक्षरे ‘बटर पेपर’वर ‘ट्रेस’ करत आणि नंतर मला देत. मी ती अक्षरे धर्मरथाच्या पत्र्यावर ‘ट्रेसिंग’ करत असे. एकदा ‘ट्रेसिंग’ केल्यानंतर ती सर्व अक्षरे परात्पर गुरु डॉक्टरांना दाखवली. त्या वेळी त्यांनी ‘एका अक्षरात फरक आहे’, असे सांगितले. दिसायला सर्व अक्षरे योग्य दिसत असल्याने मला फरक कळला नाही. नंतर मी हा भाग सद्गुरु अनुताईंना सांगितला. त्यांनी ते अक्षर बहिर्गाेल भिंगातून पाहिले आणि मला दाखवले. त्यामध्ये खरोखरंच सुईच्या टोकाएवढा फरक होता. या प्रसंगातून ‘सुईच्या टोकाएवढी चूकसुद्धा अक्षरांतील सात्त्विकता न्यून करून ईश्वरी चैतन्यापासून दूर घेऊन जाऊ शकते’, हे मला शिकायला मिळाले. यातून मला परात्पर गुरु डॉक्टरांची सर्वज्ञताही अनुभवायला मिळाली.

५. ‘गुरु पदोपदी कसे रक्षण करतात ?’, याविषयी आलेल्या अनुभूती

५ अ. पोटात दुखत असल्याने प्रदर्शनाचे फलक (चार्ट) सेवाकेंद्रात जाऊन न देता अंधेरी येथे परात्पर गुरु डॉक्टरांच्या अभ्यासवर्गाच्या ठिकाणी जाऊन देणे, गुरुदेवांनी प्रकृतीची चौकशी करून केवळ कोरा चहा पिण्यास सांगणे आणि उलटी होऊन काही वेळातच बरे वाटू लागणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी प.पू. भक्तराज महाराज यांची छायाचित्रे ‘कार्डपेपर’वर चिकटवून त्याचे प्रदर्शन फलक (चार्ट) बनवून आणायला सांगितले होते. ही सेवा मी घरी करत होतो. सेवा पूर्ण झाल्यावर ते सर्व फलक (चार्ट) सेवाकेंद्रात तातडीने पाठवणे आवश्यक होते; परंतु त्याच वेळेस माझ्या पोटात पुष्कळ दुखत होते आणि अंगात तापही होता. त्यामुळे मला सेवाकेंद्रात जाणे शक्य नव्हते. त्याच वेळी परात्पर गुरु डॉक्टरांचा अंधेरी येथे अभ्यासवर्ग होता. मी कसाबसा अभ्यासवर्गाच्या ठिकाणी पोचलो आणि सर्व फलक त्यांना दिले. त्यांनी मला विचारले, ‘‘तुम्हाला बरे नाही का ?’’ तेव्हा मी ‘मला काय होत आहे’, हे त्यांना सांगितले. त्यांनी एका साधकाला बोलावून सांगितले, ‘‘याला केवळ कोरा चहा द्या आणि विश्रांती घेऊ द्या.’’ चहा घेऊन झाल्यावर थोड्या वेळाने मला उलटी झाली. उलटी झाल्यावर मला थोडे बरे वाटायला लागले अन् मी सभागृहात येऊन बसलो. काही वेळाने परात्पर गुरु डॉक्टरांनी विचारले, ‘‘आता कसे वाटते ?’’, तेव्हा मी घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. त्यावर ते केवळ हसले. यावरून असे लक्षात आले, ‘सेवा करतांना कितीही अडचणी आल्या, तरी गुरूच आपले दुःख हरण करतात आणि सेवा करण्यासाठी शक्ती देऊन रक्षणही करतात.’

५ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘हा ताप केवळ ३ दिवस असणार आहे’, असे सांगणे आणि तिसर्‍या दिवसापासून ताप येण्याचे बंद होणे : परात्पर गुरु डॉक्टर अध्यात्मावरील प्रवचने घेण्यासाठी गावोगावी जायचे. एकदा मी त्यांच्या समवेत गेलो होतो. त्या वेळेस मला केवळ रात्रीचा ताप यायचा आणि दिवसा माझी प्रकृती एकदम ठणठणीत असायची. परात्पर गुरु डॉक्टरांना याविषयी सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘हा ताप केवळ ३ दिवसच असणार आहे.’’ त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिसर्‍या दिवसापासून ताप येण्याचे बंद झाले. त्यानंतरच्या प्रवासात मला कधीच ताप आला नाही.

६. परात्पर गुरु डॉक्टरांच्या वडिलांचा देहत्याग झाल्यावर त्यांनी स्मशानात जाऊन सर्व सिद्धता करण्यास सांगणे, नंतर साधकाच्या वडिलांचे निधन झाल्यावर सर्व एकट्याने करतांना गुरुदेवांनी पूर्वीच स्मशानातील सिद्धता करून घेतली असल्याने ती करणे सहज शक्य झाल्याचे लक्षात येणे

परात्पर गुरु डॉक्टरांच्या वडिलांनी देहत्याग केला. त्या वेळेस मी सेवाकेंद्रात सेवा करत होतो. परात्पर गुरु डॉक्टरांनी एका कागदावर लागणार्‍या साहित्याची सूची करून ती माझ्याकडे दिली आणि ‘‘स्मशानात जाऊन सर्व सिद्धता करून ये’’, असे सांगितले. हे सर्व माझ्यासाठी नवीन होते. स्मशानात गेल्यावर तेथील कामगारांना विचारून मी सर्व सिद्धता केली. नंतर मी सर्व सिद्धता झाल्याचे परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितले. या प्रसंगामधून ‘परात्पर गुरु डॉक्टरांना मला काय शिकवायचे आहे ?’, हे मला त्या वेळी कळत नव्हते. काही वर्षांनंतर माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. तेव्हा घरात मी एकटाच पुरुष होतो आणि जवळ अन्य कुणी नातेवाईकही नव्हते. तेव्हा पत्नीला वडिलांच्या मृतदेहाजवळ थांबण्यास सांगून मी स्मशानात जाऊन सर्व सिद्धता करून आलो. त्यानंतर मला वरील प्रसंग आठवला आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू आले. परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून पूर्वीच अशा प्रकारची सिद्धता करून घेतली होती. त्यामुळे मला आता ते करणे सहज शक्य झाले होते.’ (समाप्त)

– श्री. अशोक चंद्रकांत जाधव, नालासोपारा, मुंबई. (२४.१२.२०२०)

एका भंडार्‍याच्या वेळी अनुभवलेली प.पू. भक्तराज महाराज यांची सर्वज्ञता !

आम्ही बरेच साधक प.पू. भक्तराज महाराज यांच्या भंडार्‍यात सेवा करण्यासाठी जायचो. एकदा मोरचोंडी (जिल्हा यवतमाळ) येथे होणार्‍या भंडार्‍याच्या सिद्धतेसाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी ५ – ६ साधकांना १ दिवस अगोदर पाठवले. ते स्वतः दुसर्‍या दिवशी सकाळी निघणार होते; परंतु काही कारणास्तव त्यांना निघण्यास उशीर झाला. त्या वेळेस प.पू. भक्तराज महाराज यांनी विचारले, ‘‘डॉक्टरांकडून कोण आले आहे का ?’’ तेव्हा मी तेथे उपस्थित असल्यामुळे मला बोलावण्यात आले. प.पू. बाबांनी मला विचारले, ‘‘डॉक्टर कधी येणार आहेत ?’’ मी म्हणालो, ‘‘पहाटे पाच ते साडेपाच पर्यंत निघणार होते.’’ तेव्हा प.पू. बाबा म्हणाले, ‘‘नक्की किती वाजता निघणार आहेत ?’’ तेव्हा मी निरुत्तर होऊन गप्प उभा राहिलो. तेव्हा प.पू. बाबा स्वतःच म्हणाले, ‘‘ठीक आहे. ते दहा मिनिटांत येतील !’’ खरोखरंच दहा मिनिटांतच परात्पर गुरु डॉक्टर तेथे पोचले. यावरून मला प.पू. बाबांची सर्वज्ञता अनुभवायला मिळाली.

– श्री. अशोक चंद्रकांत जाधव, नालासोपारा, मुंबई. (२४.१२.२०२०)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक