महाराष्ट्र : विधानसभेत ६ सहस्र २५० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर !

कृषीपंपधारक शेतकर्‍यांसाठी ४९० कोटी, तर सारथीसाठी १०६ कोटी रुपयांची तरतूद !

मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधीमंडळात ६ सहस्र २५० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. वीज थकबाकीपोटी शेतकर्‍यांची वीज खंडित केली जात आहे, असा आरोप विरोधी पक्षाकडून होत असतांना सरकारने शेतकर्‍यांच्या वीज सवलतीसाठी ४९० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी ‘आमरण उपोषण’ केले होते. या आंदोलनाची नोंद घेऊन राज्यशासनाने सारथी संस्थेसाठी १०६ कोटी रुपये, तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी १०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत, तसेच ‘महाज्योती’ संस्थेसाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत, तर वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत वर्ष २०२१-२२ या वर्षातील ६ सहस्र २५० कोटी ३६ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.

या मागण्यांवर चर्चा होऊन त्या संमत केल्या जातील. पुरवणी मागण्यांतील २ सहस्र ६९९ कोटी रुपयांच्या मागण्या या अनिवार्य व्ययाच्या आहेत, तर ३ सहस्र ४९० कोटी रुपयांच्या मागण्या कार्यक्रमांतर्गत व्ययाच्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने महापालिका क्षेत्रातील पायभूत सुविधांसाठी पुरवणी मागणीत ६०० कोटी रुपये आणि नगरपालिकांना साहाय्यक अनुदानापोटी १३३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

निवृत्त सरकारी कर्मचार्‍यांना द्यायच्या निवृत्ती वेतनसाठी १ सहस्र ५०० कोटी रुपये आणि उद्योग विभागाच्या सामूहिक प्रोत्साहन योजनेसाठी ८७१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित ग्राहक, यंत्रमागधारक तसेच कृषीपंपधारक शेतकर्‍यांना वीज सवलतीसाठी महावितरण आस्थापनाला एकूण १ सहस्र ४७७ कोटी रुपये, तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी ८२ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पुरवणी मागणीतील खातेनिहाय महत्त्वाच्या तरतुदी अशा…

उद्योग, ऊर्जा, कामगार २ सहस्र ८४८ कोटी रुपये
वित्त आणि नियोजन १ सहस्र ७६३ कोटी रुपये
नगरविकास ७३३ कोटी रुपये
महसूल आणि वने १८१ कोटी रुपये
इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग १६४ कोटी रुपये
महिला आणि बालविकास १२६ कोटी रुपये
सहकार आणि पणन ८२ कोटी रुपये
कृषी ८१ कोटी रुपये
जलसंपदा ७५ कोटी रुपये
सामाजिक न्याय ५३ कोटी रुपये

वर्ष २०२१-२२ या वर्षातील पुरवणी मागण्या…

जुलै – २३ सहस्र १४९ कोटी रुपये
डिसेंबर – ३१ सहस्र २९८ कोटी रुपये