मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांचे विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन !

विधीमंडळाच्या इमारतीच्या पायर्‍यांवर आंदोलन करतांना विरोधक !

मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – विरोधकांनी ‘नवाब मलिक यांना पाठीशी घालणार्‍यांचा धिक्कार असो’, अशा आशयाच्या घोषणा देत  विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळाच्या इमारतीच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. हातात फलक धरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांसह भाजपचे आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते. अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत असलेले अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे.