कलुषित ‘व्हिजन’ !

स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनीच त्या क्षेत्रातील अयोग्य घटनांना वाचा फोडणे आवश्यक !

स्मृती शहा मार्गदर्शिका : ‘व्हिजन आय.ए.एस्.’

प्रशासन हे लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे. आपल्याकडे प्रत्येक ५ वर्षांनी निवडणुका होऊन शासनकर्ते पालटत असले, तरी प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकारी तेच असतात. शासनकर्त्यांनी लागू केलेल्या योजनांची कार्यवाही करणारे प्रशासनच असते. त्यामुळे ‘देश खर्‍या अर्थाने प्रशासनच चालवते’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या काही वर्षांत हिंदूंना प्रशासकीय स्तरावर सातत्याने संघर्ष करावा लागत आहे. त्याची कारणे गेल्या काही वर्षांत समोर येत आहेत. ख्रिस्ती, इस्लामी आदींची बाजू घेऊन हिंदूंना सातत्याने डिवचणारे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या तिरकस नजरा हिंदुत्वनिष्ठांनी अनेकदा अनुभवलेल्या असतात. जन्माने हिंदू असूनही ही मंडळी अशी का वागतात ? हा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. त्याचे उत्तर आहे, प्रशासकीय अधिकारी होण्यापूर्वीच स्पर्धा परीक्षांची सिद्धता करतांना त्यांना तसे बाळकडू दिले जात आहे ! नुकतेच लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या पूर्वसिद्धतेसाठी मार्गदर्शन करणार्‍या ‘व्हिजन आय.ए.एस्.’ या प्रशिक्षण संस्थेतील एक व्हिडिओ उघड झाल्यामुळे तेथे कशा प्रकारे हिंदुद्वेष पसरवला जात आहे, हे समोर आले आहे.

स्मृती शहा नावाच्या मार्गदर्शिका इस्लामविषयी शिकवतांना सांगतात, ‘‘इस्लाम उदारतावादी होता. इस्लाममध्ये समानता शिकवली जाते. इस्लाममधील बंधूभाव आणि रूढीवाद-जातीवाद नसणे, यांमुळे तो सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनला होता. त्या वेळी लोक स्वतःहून इस्लामचा स्वीकार करू लागले. अशा वेळी हिंदु धर्म इस्लामपेक्षा फार काही वेगळा नाही, हे भासवण्यासाठी भक्ती आंदोलन आरंभण्यात आले.’’ हे विचार म्हणजे स्मृती शहा यांचा स्वतःचाच एक मोठा शोध आहे.

कलुषित ‘व्हिजन’ !

स्मृती शहा आणि ‘व्हिजन’चे अन्य मार्गदर्शक यांचेही पुष्कळ व्हिडिओ आता समोर येत आहेत. त्यात त्यांनी शबरीमला येथील प्रथांविषयी टिंगल, काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांचे समर्थन आदी केलेले पहायला मिळते. यापूर्वीही वैचारिक जिहादी आतंकवादी डॉ. झाकीर नाईक यांच्या जकात फाऊंडेशनने यू.पी.एस्.सी. परीक्षांद्वारे मुसलमान विद्यार्थी निवडले जाण्यासाठी केलेला कट उघड झाला आहे. एकीकडे प्रशासनात मुसलमानच असतील, यासाठी कट-कारस्थाने रचायची आणि अन्य कोणत्याही धर्माची व्यक्ती प्रशासनात आली, तरी ती वैचारिकदृष्ट्या इस्लामीच होईल, अशी शिकवण द्यायची ! बरे स्मृती शहा ज्या उदारतेच्या आणि समानतेच्या गप्पा मारत आहेत, ती इस्लाममध्ये त्यांना कुठे बरे दिसली ? इस्लामच्या इतिहासात पानापानांवर हिंदुद्वेष आणि हिंसा दिसून येते. लोक स्वतःहून इस्लामकडे आकर्षित झाले, याचा काय पुरावा आहे ? इस्लामने तलवारीच्या बळावर केलेली धर्मांतरे, महिलांवरील अत्याचार यांचा इतिहास पानापानांवर दिसून येतो. सत्ताप्राप्तीसाठी स्वतःच्या पित्याची हत्या करणारे राज्यकर्ते देणारा इस्लाम उदारतावादी कसा असू शकतो ? स्मृती शहा अशा कोणत्या इतिहासाच्या अभ्यासक आहेत की, त्यांनी असा विकृत बिनबुडाचा इतिहास शिकवावा ? स्मृती शहा या गणिताच्या पदवीधर आहेत. असे असूनही त्या इतिहास शिकवतात, हा मोठा विनोद आहे. स्मृती शहा त्याच सेंट स्टीफन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत, जेथे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता जे. साईदीपक यांच्या कार्यक्रमाला मोठा विरोध झाला होता. अशांकडून जाणीवपूर्वक इस्लाममध्ये कधीच पहायला न मिळालेल्या मूल्यांचे उदात्तीकरण आणि हिंदु धर्मियांच्या श्रद्धांचे हनन पहायला मिळणे, हे नवल नाही. ‘व्हिजन आय.ए.एस्.’ संस्थेने यावर स्पष्टीकरण दिले आहे. असे असले, तरी अलीकडे उदारता, समानता, धर्मनिरपेक्षता आदी शब्द वापरणे प्रतिष्ठेचे झाले आहे. हिंदूंची हेटाळणी केली की, स्वतः पुष्कळ पुढारलेले आहोत, हे दाखवता येते. त्यामुळेच सनदी अधिकारी, उच्च आर्थिक उत्पन्न असलेले गट जाणीवपूर्वक धर्मनिरपेक्षतावादी भूमिका स्वीकारतात. त्यात जर असे चुकीचे शिक्षण मिळाले, तर त्याला खतपाणीच मिळते. स्मृती शहा यांना इस्लाममधील बंधुभाव आणि एकता यांचा अनुभवच घ्यायचा असेल, तर त्यांनी जरूर निर्णय घ्यावा; मात्र अशी विधाने करतांना त्याला पुराव्यांचाही आधार द्यावा. फार दूर नको, सध्या देशभरात हिजाबचा प्रश्न चिघळला असतांना इस्लाममधील कोणता बंधुभाव आणि एकता दिसून येत आहे ?

Vision IAS
statement on recent events surrounding a video clip #VisionIAS

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

शिक्षण सत्यावर आधारित हवे !

प्रश्न हिंदूंचे हनन आणि इस्लामचे उदात्तीकरण इतकाच नसतो. अशी विद्वेषी मानसिकता घेऊन हे स्पर्धा परीक्षार्थी उद्या ज्या ठिकाणी कामास रुजू होतील, तेथे सर्वत्र सत्य इतिहास सांगणार्‍या हिंदूंचा दुःस्वास करतील. सध्या अनेक ठिकाणी हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांना विरोध केला जातो, पोलीस-प्रशासनाची अनुमती मिळवतांना पुष्कळ वेळ खर्च केला जातो. सामाजिक संघर्षाच्या काळात हिंदूंनी कोणतीही भूमिका घेतली, तरी त्यांना प्रशासनाचा रोष ओढवून घ्यावा लागतो. त्याला कारण हे विखारी शिक्षण आहे. वास्तविक शिक्षण सत्यावर आधारित असायला हवे. भारताचा उज्ज्वल इतिहास शिकवला, तर त्यातून घडणारे विद्यार्थी सुशासन करतील. आता पायाच असा असत्याचा आणि द्वेषाचा असल्यामुळे त्यावर आलेली फळे कशी आहेत, हे वेगळे सांगायला नको ! इस्लामी आक्रमकांचा आदर्श समोर ठेवल्यानंतर त्यांच्याकडून आपण छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याची अपेक्षा करू शकत नाही. जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात तेथील बहुसंख्य समुदायाच्या प्राचीन इतिहासाचे विकृतीकरण केले जात नाही. आपल्या देशाचा प्राचीन वारसा किती उदात्त आहे ? ते शिकवून भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी प्रेरणा दिली जाते. आपला देश किती सामान्य होता आणि आलेले आक्रमकच कसे महान होते ? हे शिकवणारा अन् असली शिकवण ऐकून घेणारा एकमेव देश भारत आहे ! शिक्षक सांगतील, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायला स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थीही फार लहान नसतात. त्यांच्यातील अभ्यासूंनीच आता अशा मानसिकतांचे त्या त्या वेळी खंडण करणे आणि याला वाचा फोडणे, यातून हे अपप्रकार रोखण्यास साहाय्य होणार आहे !