मुंबई – नागरिकांनी प्रेरणा घेऊ नये, यासाठी देशातील मंदिरे आणि पराक्रम यांचा इतिहास जाणीवपूर्वक दडवण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळातही तीच परंपरा चालू राहिली. शालेय आणि महाविद्यालयीन पुस्तकांमधूनही तो फारसा उलगडला नाही; पण संशोधक, लेखक आणि इतिहासकार यांनी तो लोकांपर्यंत पोचवला. प्राचीन मंदिरे ही पराक्रम, शास्त्र आणि ज्ञान यांची साक्ष देणारी होती. केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिरापासून देशभरातील अनेक मंदिरे ही ‘स्थापत्यशास्त्र आणि अन्य क्षेत्रांतील भारतियांचे ज्ञान किती प्रगत होते’, याचा प्रत्यय देतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी २८ फेब्रुवारीला येथे केले. दीपा मंडलिक यांनी लिहिलेल्या ‘पराक्रमी हिंदु राजांची अद्वितीय मंदिरे’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. या वेळी ज्येष्ठ पुरातत्व वेत्ते, तसेच मूर्तीशास्त्र आणि मंदिर यांचे अभ्यासक डॉ. गो.ब. देगलूरकर उपस्थित होते.
“एका मंदिरासाठी एवढं मोठं आंदोलन भारतात का झालं?” सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं कारण, म्हणाले… https://t.co/pog3n8OhNV
— LoksattaLive (@LoksattaLive) February 28, 2022
डॉ. भागवत पुढे म्हणाले, ‘‘मंदिरांमध्ये श्रद्धेने गेल्यावर ब्रह्मभावनेचा अनुभव येतो. मंदिरे आध्यात्मिक अनुभूती देणारी आणि मोक्षाप्रत नेणारीही आहेत. मंदिरांशी समाजजीवनही निगडित होते. मंदिरांमध्ये पाठशाळा, तसेच व्यापारविषयक गोष्टी होत्या. परिसरातील लोकांचे अर्थार्जनही होत होते. पराक्रमी हिंदु राजांनी भव्य मंदिरे उभारली; पण ती स्वत:साठी न ठेवता समाजासाठी ठेवली. मंदिरांची संपत्तीही जपली.’’
डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘‘भारतीय संस्कृती ही जगातील श्रेष्ठ संस्कृती आहे. मूर्ती आणि मंदिरे हे भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. इजिप्त, इटली, इराण यांसह अन्य देशांमध्येही मंदिरे होती. तथापि आता ती कुठे आहेत ? वस्तूसंग्रहालयातूनच त्यांचा प्रत्यय येतो.’’