संभाजीनगर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर त्यांच्या मंत्रीपदाच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने मराठवाडा येथे २५ फेब्रुवारी या दिवशी आंदोलन करण्यात आले. संभाजीनगर, हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. संभाजीनगर येथे जिल्हाध्यक्ष संजय कनेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले, तर भाजपचे आमदार अतुल सावे यांनी ‘ईडी’ने मलिक यांच्यावर कारवाई का केली ? याची माहिती पत्रकार बैठकीत दिली.
लातूर येथे आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. हिंगोली येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेसने ‘ईडी’ने केलेल्या कारवाईच्या विरोधात जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक येथे धरणे आंदोलन केले. धाराशिवमध्येही भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ‘नवाब मलिक यांचे देशद्रोही कारवाया करणार्या व्यक्तींशी आर्थिक लागेबांधे आहेत. त्यामुळे झालेली कारवाई योग्य आहे’, असा दावा आमदार अतुल सावे यांनी संभाजीनगर येथे केला. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेश मेहता यांची उपस्थिती होती.