नागपूर – मराठा समाजाच्या आरक्षण आणि अन्य मागण्या यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आझाद मैदानावर २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण चालू केले आहे. ‘आपला लढा हा ३० टक्के श्रीमंत मराठ्यांसाठी नाही, तर गरीब मराठा समाजासाठी आहे’, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनात त्यांच्या पत्नी संयोगिताराजे याही सहभागी झाल्या आहेत.
शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आझाद मैदानावर उपस्थित झाले आहेत. खासदार धैर्यशील माने म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीच्या या संदर्भात बैठका चालू आहेत. काहीही करून आजचा दिवस उलटता कामा नये. मी या संबंधी मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडणार असून यावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल.’’
काँग्रेसचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, राज्य सरकार छत्रपती संभाजीराजे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. संभाजीराजे यांचे समाधान करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न चालू आहे.