आशासेविकांना ५ मास मानधन न मिळाल्यामुळे त्यांचा जिल्हा परिषदेवर लाटणे मोर्चा !

आशासेविकांना मानधनासाठी मोर्चा का काढावा लागतो ? प्रशासन स्वतःहून का लक्ष देत नाही ?

सातारा, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – ५ मासांपासून केंद्र आणि राज्य सरकारने आशासेविका आणि गट प्रवर्तक यांना मानधन दिलेले नाही. त्यामुळे जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारला चेतावणी देण्यासाठी आशा आणि गट प्रवर्तक यांच्याकडून जिल्हा परिषदेवर लाटणे मोर्चा काढण्यात आला.
या वेळी जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

निवेदनामध्ये म्हटले आहे की, आशा आणि गट प्रवर्तक यांना विनामोबदला कामाची सक्ती केली जात आहे. काम करण्यास नकार दर्शवला, तर सक्तीचे त्यागपत्र मागण्यात येत आहे. ही सक्ती करण्यात येऊ नये, तसे आदेश काढण्यात यावेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विनामोबदला पूर्ण दिवस कर्तव्यावर थांबवले जात आहे. याविषयी सक्ती केली जात आहे. हे शासनाने थांबवावे आणि मानधनाचा प्रश्न सोडवावा.