हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात समन्वयक श्री. मनोज खाडये (वय ५४ वर्षे) १५.२.२०२२ या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. मंजुषा खाडये यांना श्री. मनोज यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. ‘श्री. मनोज महाविद्यालयात असतांना खेळाच्या समवेत अभ्यासाकडेही लक्ष देऊन परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावायचे.
२. नोकरीच्या आरंभीच्या काळात संघर्ष करावा लागणे
त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर घरच्या परिस्थितीमुळे त्यांना लगेचच नोकरी करावी लागली. तेव्हा आरंभीची २ वर्षे त्यांना वडापाव खाऊन दिवस घालवावे लागले होते. याच कालावधीत त्यांना पुष्कळ संघर्ष सहन करावा लागला. त्यांनी अनेक लोकांना वेळोवेळी साहाय्य करून त्यांना जोडून ठेवले.
ते आम्हाला त्यांच्या या भूतकाळाविषयी सांगतात. त्यामुळे आमची मुलगी कु. वैदेही (वय १५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ५३ टक्के) हिला त्यातून पुष्कळ शिकता येते.
३. मासातून काही दिवस कर्तव्यभावनेने घरी येणे आणि पुन्हा सेवेसाठी बाहेरगावी जाणे
आमचे घर सर्व सुखसोयींनी युक्त आहे. असे असूनसुद्धा त्यांचा कल घरी रहाण्याकडे अत्यल्प असतो. कर्तव्यभावनेने मासातून काही दिवस ते घरी येतात, तसेच प्रकृती बरी नसेल किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसाराचे नियोजन असेल, तेव्हा ते घरी येतात आणि ठरवलेल्या कालावधीतच ते पुन्हा सेवेसाठी बाहेरगावी जातात.
४. सकारात्मकता
ते नेहमी सकारात्मक असतात. ‘त्यांच्यातील सकारात्मकतेचा परिणाम त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवरही होत असतो’, असे त्यांचा प्रसारातील अनुभव ऐकतांना जाणवते.
५. कल्पक बुद्धी
त्यांना पुष्कळ नवनवीन कल्पना सुचत असतात. ‘एखाद्या साधकाने नवीन घर विकत घेतले, तर त्या घरात आणखी काही सुधारणा करू शकतो का ? ते घर आश्रम होण्याच्या दृष्टीकोनातून काय प्रयत्न करू शकतो ?’, असे त्यांना ते घर पाहिल्यावर पटपट सुचते. त्यानुसार ते संबंधित साधकाला सुचवतात.
६. उत्तम निर्णयक्षमता
त्यांनी दिलेले निर्णय त्या त्या परिस्थितीला अगदी योग्यरित्या जुळतात. ‘काळ पालटला, तरी त्यांनी दिलेला निर्णय त्या वेळीही योग्यच असतो’, असा अनुभव कित्येक वेळा येतो.
७. सेवेची तळमळ
गेले काही दिवस ते रुग्णालयात होते. १० – १२ दिवसांनी मुख्य व्याधी उणावल्यावर ‘उर्वरित व्याधी सेवेतील चैतन्यामुळेच उणावेल’, या भावाने त्यांनी प्रसारसेवा चालू केली.
८. विविध स्तरांवर परिणामकारक धर्मप्रसार करणे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळणे
अ. शिक्षकांच्या कार्यशाळेत (शिबिरात) एकाने अडचण मांडली, ‘‘सर्व धर्मातील विद्यार्थी असल्याने साधना सांगू शकत नाही.’’ त्यावर श्री. मनोज यांनी सांगितले, ‘‘काही वर्षांपूर्वी अरब देशांतील काही पर्यटक गोव्याच्या विमानतळावरील प्रेक्षणीय स्थळांची नावे वाचून रामनाथी आश्रमात आले होते. तेथील व्यवस्थापन पाहून ते पुष्कळ प्रभावित झाले, तसेच त्यांनी साधनाही समजून घेतली. त्यांना त्यांच्या देशात जाऊन साधनेचा प्रसार करायचा होता; परंतु त्यांच्या देशातील नियम कडक असल्यामुळे त्यांना तिकडे साधनेचा प्रसार करणे शक्य नव्हते. त्या वेळी त्यांनी तिकडे स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेचा प्रसार केला आणि त्यांना प्रतिसादही चांगला मिळाला.’’ हा प्रसंग शिक्षकांच्या शिबिरात सांगितल्यामुळे त्या शिक्षकाची अडचणही सुटली आणि त्यांना ‘विद्यार्थ्यांना आदर्श घडवण्यासाठी बरेच पर्याय आहेत’, अशी दिशाही मिळाली.
आ. ‘हलाल सर्टिफिकेट’चा विषय मांडताना श्री. मनोज यांनी विविध प्रयोग केले. ‘हलाल सर्टिफाइड’ उत्पादनांची छायाचित्रे, त्यांचे ‘लोगो’, त्यांची कार्यपद्धत अशा स्वरूपाची ‘पी.पी.टी.’ (टीप) बनवून घेणे; विषय मांडल्यानंतर समाजातून आलेला प्रतिसाद आणि लोकांनी केलेल्या कृती यांचा पुढील विषय मांडताना उल्लेख करणे, हलालच्या विषयाची सर्वसामान्य साधकही मांडू शकेल, अशा सोप्या शब्दांत मांडणी करून तो सर्वांना समजावणे’, अशा प्रकारे ते परिणामकारक विषय मांडतात.
टीप – ‘Power Point Presentation’ हे एक सॉफ्टवेअर असून यावर संबंधित विषयाची विविध वैशिष्ट्ये दशर्वता येतात.’- संकलक)
९. सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वातीताई खाडये (लहान बहीण) यांच्यावर अपार श्रद्धा असणे
सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये त्यांच्या सगळ्यात लहान बहीण असूनसुद्धा त्यांची सद्गुरु ताईंवर पूर्ण श्रद्धा आहे. गेल्या काही मासांपासून ती वृद्धींगत होत आहे. ते सद्गुरु ताईंनी सांगितलेल्या सेवा अधिकाधिक तळमळीने करण्यासाठी प्रयत्न करतात.
१०. (सुश्री (कु.)) स्वातीताई खाडये यांच्याप्रतीचा भाव
‘आपल्या कुटुंबातील एक सदस्य सद्गुरु आहे आणि त्यांच्या कृपेने आपले रक्षण होत आहे, तसेच आपल्या साधनेला दिशा मिळत आहे आणि स्फूर्ती मिळत आहे’, असा त्यांचा भाव असतो.
११. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती मनात कृतज्ञताभाव असणे
देवाच्या कृपेने त्यांना पुष्कळ अल्प वयात भरपूर यश मिळाले. त्यामुळे वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांना स्वेच्छानिवृत्ती घेऊन सेवेसाठी पूर्णवेळ देता आला. हा प्रसंग सांगतांना त्यांच्या मनात प.पू. गुरुदेवांविषयी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी) कृतज्ञताभाव जाणवतो.
१२. जाणवलेला पालट – व्यष्टी साधनेचे गांभीर्य वाढणे
‘गत काही मासांमध्ये त्यांचे व्यष्टी साधनेचे गांभीर्य वाढले आहे’, असे जाणवते. त्यांचे ‘नामजपादी उपायपूर्ण करणे, स्वयंसूचना सत्रे करणे’ इत्यादी प्रयत्न चालू झाले आहेत.
१३. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘हे गुरुराया, आपल्या कृपेनेच श्री. मनोज मला पती म्हणून लाभले. त्यांच्या माध्यमातून तुम्हीच मला घडवत आहात. ‘त्यांच्या माध्यमातून तुम्ही माझ्यातील स्वभावदोषांची मला जाणीव करून दिलीत. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवून ती राबवून घेऊन आमच्यामध्ये सुसंवाद निर्माण केलात. त्यांच्याकडे गुरुसेवक म्हणून पहायला शिकवलेत’, याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
‘हे गुरुराया, आम्हा उभयतांकडून आपल्याला अपेक्षित अशी सेवा उत्तरोत्तर घडावी’, अशी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. मंजुषा मनोज खाड्ये (पत्नी), कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (४.२.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |