मुंबई – यापूर्वी नवाब मलिक यांनी खोटे आरोप केले होते. त्यांना न्यायालयात २ वेळा क्षमायाचना करावी लागली. त्यांचा कित्ता संजय राऊत गिरवत आहेत. स्वत: भ्रष्टाचारात अडकल्यामुळे संजय राऊत खोटे आरोप करत आहोत, असे प्रत्युत्तर भाजपचे पदाधिकारी मोहीत कंबोज यांनी दिले. १५ फेब्रुवारी या दिवशी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन कंबोज ‘पी.एम्.सी.’ बँक घोटाळ्यात कंबोज अडकले असल्याचा आरोप केला होता. त्याला कंबोज यांनी उत्तर दिले.
या वेळी मोहीत कंबोज म्हणाले, ‘‘राकेश वाधवान यांच्याकडून १२ सहस्र कोटी रुपयांना १०० लाख रुपये चौरस मीटरप्रमाणे भूमी खरेदी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी माझ्यावर केला. इतकी महाग जमीन कुठे असते का ? आरोप करतांना राऊत यांनी अभ्यास करायला हवा. पत्राचाळ येथील जागा मी गुरु आशिष यांच्याकडून खरेदी केली आहे. त्यामध्ये माझे पैसे डुबले. याविषयी मी गुन्हा नोंदवला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता असतांना पत्राचाळमधील जागा राकेश वाधवान यांना विकसित करण्यासाठी देण्यात आली; मात्र अद्यापही त्या जागेचा विकास झालेला नाही. किरीट सोमय्या यांच्या सारख्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधीसाठी त्यांनी वापरलेली भाषा अत्यंत अयोग्य आहे. त्यांच्याकडे उत्तर नाही; म्हणून ते शिव्या देत आहेत. मी संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देतांना शिव्या दिल्या नाहीत, तर माझ्या निर्दाेषत्वाची कागदपत्रे दाखवली. संजय राऊत हे स्वत: भ्रष्टाचारात अडकले आहेत. त्यामुळे खोट्या कथा घेऊन ते जनतेपुढे येत आहेत. त्यांनी भ्रष्टाचार केला नसेल, तर त्यांना घाबरण्याचे कारण नाही. त्यांचा भ्रष्टाचार उघड होत असल्यामुळे ते घाबरले आहेत.’’