शाळेच्या दुरुस्तीसाठी सांगेली ग्रामस्थांचे आज सावंतवाडीत उपोषण

  • शाळेचे छप्पर तुटून विद्यार्थ्यांची जीवितहानी होऊ शकते, एवढेही गांभीर्य प्रशासनाला कसे नाही ? – संपादक
  • शाळेचे छप्पर दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांना का करावी लागते ? प्रशासनाने हे काम स्वतःच करायला हवे ! – संपादक
  • शाळेच्या छप्पराच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांना उपोषण करावे लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांना लज्जास्पद ! – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

सावंतवाडी – तालुक्यातील सांगेली येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेचे छप्पर धोकादायक झाले आहे. याची दुरुस्ती करावी, यासाठी शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, तसेच पंचायत समिती यांच्याकडे सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या शाळेत इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंची मुले शिक्षण घेत आहेत. पंचक्रोशीतील ही सर्वांत मोठी शाळा आहे, असे असतांना छपराच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेले विद्यार्थी आणि पालक यांनी १६ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता येथील पंचायत समिती कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याची चेतावणी दिली आहे. (शाळेचे छप्पर धोकादायक स्थितीत असूनही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या प्रशासनाचा कारभार कसा चालत असेल, याचा विचार न केलेला बरा ! – संपादक)