आजी-माजी संचालकांना वसुलीच्या नोटिसा !

नाशिक जिल्हा बँकेतील १८२ कोटी रुपयांच्या अनियमित कर्ज वाटपाचे प्रकरण

अशी नोटीस पाठवण्याची कारवाई राज्यातील इतर बँका, पतसंस्था आणि सेवासंस्था यांमध्ये घोटाळा करणार्‍या आजी-माजी संचालकांवर होणे आवश्यक आहे; कारण थकबाकीची वसुली न होण्यास कर्जदारासमवेत हेही उत्तरदायी असतात. असे केल्यावरच कर्जाची थकित रक्कम वसूल होऊ शकते ! – संपादक

नाशिक जिल्हा बँक

नाशिक – येथील नाशिक जिल्हा बँकेच्या १८२ कोटी रुपयांच्या अनियमित कर्जवाटप प्रकरणी बँकेचे आजी-माजी संचालक असलेले विद्यमान आणि माजी आमदार-खासदार यांना वसुलीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यात विद्यमान आमदार नरेंद्र दराडे, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार जिवा गावित, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, वसंत गीते यांच्यासह २९ आजी-माजी संचालक आणि १५ अधिकारी अन् कर्मचारी यांचा समावेश आहे.

त्यामुळे ‘ही वसुली होणार का ?’, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. या संस्थांचा समावेश नाशिक सहकारी साखर कारखाना, निफाड सहकारी साखर कारखाना, आर्मस्ट्राँग सहकारी साखर कारखाना यांच्यासह अनेक संस्थांना देण्यात आलेल्या १८२ कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात विभागीय सहनिबंधकानी अनियमितता झाल्याचा ठपका ठेवला आहे, तसेच आजी-माजी संचालकांना १८ फेब्रुवारीपर्यंत वसुलीची रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत, अन्यथा या प्रकरणी दोषींची संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.