अमेरिका तिच्या नागरिकांना युक्रेनमधून मायदेशी परतण्याच्या दिलेल्या आदेशावर ठाम !

  • रशिया-युक्रेन वाद

  • आतापर्यंत १२ हून अधिक देशांनी त्यांच्या नागरिकांना युक्रेनमधून परत बोलावले !

  • दुसर्‍या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे ब्रिटनचे मत !

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकेन यांनी रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या शक्यतेवरून युक्रेनमधील तिचे नागरिक, तसेच तेथील अमेरिकी दूतावासातील अधिकारी अन् कर्मचारी यांना मायदेशी बोलावण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.

आतापर्यंत अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनी यांच्यासह १२ हून अधिक देशांनी त्यांच्या नागरिकांना युक्रेन सोडण्याचे आवाहन केले आहे. युक्रेन आणि रशिया यांच्या सीमेवर रशियाचे १ लाखाहून अधिक सैनिक आहेत. तथापि रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

तिसर्‍या महायुद्धाची शक्यता !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी १२ फेब्रुवारीला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना ‘रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, तर त्यास त्वरित मोठी किंमत मोजावी लागेल’, अशी चेतावणी दिली. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाचे सचिव बेन वॉलेस यांनी ‘पाश्‍चात्त्य राष्ट्रांचे मुत्सद्देगिरीचे प्रयत्न आणि ‘दुसरे महायुद्ध होऊ नये’, यासाठी नाझी जर्मनीच्या लांगूलचालनाचे पाश्‍चात्त्य राष्ट्रांचे प्रयत्न’ यांत साम्य आहे, असे सांगितले. वॉलेस यांनी ‘संडे टाईम्स’ या वृत्तपत्राला सांगितले की, सध्या चालू असलेले प्रयत्न हे हिटलरशी केलेल्या ‘म्युनिच करारा’सारखे होते, जे दुसरे महायुद्ध टाळू शकले नाही.