हिजाबचे प्रकरण राष्ट्रीय सूत्र बनवू नका ! – सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी देहली – कर्नाटकातील हिजाब प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ११ फेब्रुवारी या दिवशी पुन्हा सुनावणी झाली. ‘आम्ही योग्य वेळी या याचिकेवर सुनावणी करू. तुम्ही हे राष्ट्रीय सूत्र बनवू नका’, असे न्यायालयाने सांगितले. यापूर्वी न्यायालयाने यावर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला होता. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात, म्हणजेच निकाल येईपर्यंत धार्मिक पोषाखावर बंदी घालण्याच्या निर्णयाच्या विरोधात काँग्रेसचे नेते बी.व्ही. श्रीनिवास राव यांनी ही याचिका प्रविष्ट केली होती.

काँग्रेसचे नेते बी.व्ही. श्रीनिवास राव

सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांच्या खंडपिठाने याचिकाकर्त्यांना सांगितले की, हे प्रकरण फार मोठ्या प्रमाणावर पसरवू नका. तुम्ही हे राष्ट्रीय सूत्र बनवू नका. तुम्ही यावर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहा. आम्ही सर्व नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या रक्षणासाठी बसलो आहोत. याप्रकरणी योग्य वेळी आमच्याकडून हस्तक्षेप केला जाईल. यावर योग्य वेळी सुनावणी होईल. कर्नाटकमध्ये काय चालले आहे, ते आम्ही पहात आहोत.