पूर्वी साधक परात्पर गुरु डॉक्टरांची भेट घेत असत. ही भेट झाल्यानंतर मी साधकांना उत्साहाने विचारायचो, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘तिसरे महायुद्ध कधी चालू होणार ? हिंदु राष्ट्राची स्थापना होण्याआधी काय घडामोडी घडणार आहेत ?’ यांविषयी काही सांगितले का ?’ त्या प्रत्येक वेळी साधक मला म्हणायचे, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर हिंदु राष्ट्राविषयी केवळ १ – २ वाक्ये बोलले आहेत आणि अन्य वेळ त्यांनी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन अन् साधकांची आध्यात्मिक प्रगती यांविषयी मार्गदर्शन केले.’’ हे ऐकून मला जे हवे ते न मिळाल्याने त्या वेळी माझ्या उत्साह न्यून व्हायचा आणि माझ्या मनात विचार यायचा ‘वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची अभूतपूर्व आणि अलौकिक घटना घडणार आहे. त्याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांनी अधिक बोलायला हवे. ते असे का करतात ?’
त्यानंतर काही दिवसांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये (परात्पर गुरु) परशराम पांडे महाराज यांची एक चौकट वाचनात आली आणि माझ्या मनातील प्रश्नाचे उत्तर मिळाले. ही चौकट पुढीलप्रमाणे होती, ‘महाभारताच्या ऐन युद्धप्रसंगी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धाविषयी काही न सांगता त्याला जीवनाचे लक्ष्य गाठण्यासाठी भगवद्गीता सांगतो.’
ही चौकट वाचून माझ्या मनात पुढील विचार आले, ‘महाभारतातील युद्ध तात्कालिक होते आणि श्रीकृष्णाने सूक्ष्मातून ते आधीच जिंकले होते. यात अर्जुनाची आध्यात्मिक प्रगती होऊन त्याच्या जीवनाचे सार्थक होणे महत्त्वाचे होते. त्यामुळे श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, त्याप्रमाणे वर्ष २०२३ मध्ये काळानुरूप आणि संतांच्या संकल्पामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टर याविषयी फारसे न बोलता साधकांची आध्यात्मिक प्रगती होऊन त्यांच्या जीवनाचे सार्थक होण्यावर भर देतात आणि त्या दृष्टीने मार्गदर्शन करतात. यातून श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या वागण्यातील साम्य दिसून येते.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१४.९.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |