साक्षीदाराने साक्ष न दिल्यास त्याच्या कुटुंबाला इजा पोचवण्याची ‘ए.टी.एस्.’ने दिली होती धमकी !

  • मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील साक्षीदाराचे आतंकवादविरोधी पथकावरच आरोप !

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकार्‍यांच्या नावांचा उल्लेख करण्यासाठी होता साक्षीदारावर दबाव !

मुंबई – ३ फेब्रुवारी या दिवशी मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील न्यायालयामध्ये सुनावणीत या प्रकरणातील साक्षीदार क्रमांक ४० ची साक्ष झाली. त्याने आतंकवादविरोधी पथकाचे माजी अधिकारी परमबीर सिंह यांच्यावर आणखी १ गंभीर आरोप केला आहे. या साक्षीदाराने सांगितले, ‘‘मी जबाब दिला नाही, तर माझ्या कुटुंबाला इजा पोचवण्यात येईल, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही मोठ्या पदाधिकार्‍यांच्या नावांचा उल्लेख करावा’’, असा दबाव आतंकवादविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी साक्षीदारांवर टाकला होता. ‘या उच्चपदस्थ संघाच्या पदाधिकार्‍यांमध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, स्वामी असिमानंद, प्रो. देवधर, काकाजी आणि इंद्रेश कुमार यांची नावे होती.’ असे या साक्षीदाराने सांगितले.  आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालीन अधिकारी परमबीर सिंह आणि पोलीस उपायुक्त श्रीराव यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे.

१७ साक्षीदारांनी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयात सांगितले, ‘‘आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.) त्यांच्यावर दबाव टाकून साक्षीदार बनवून घेतले आहे’’, असे सांगून मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात आतापर्यंत १७ साक्षीदारांनी त्यांची साक्ष पालटली आहे. येथील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए) न्यायालयामध्ये मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात प्रतिदिन सुनावणी चालू आहे. या प्रकरणात आतापर्यंत २२६ साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.