भाजपचे आमदार नितेश राणे यांना पोलीस कोठडी

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या आक्रमणाचे प्रकरण

नितेश राणे यांना पोलीस कोठडी

सिंधुदुर्ग – कणकवली येथे १८ डिसेंबर २०२१ या दिवशी शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणात संशयित आरोपी असलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने १ फेब्रुवारी या दिवशी फेटाळला. त्यानंतर आमदार राणे २ फेब्रुवारी या दिवशी ‘मी न्यायालयाचा आदर ठेवून शरण जात आहे’, असे सांगत कणकवली येथील प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी यांच्या न्यायालयात शरण आले. या प्रकरणी न्यायालयाने आमदार राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी बजावली. आमदार राणे यांनी अटक टळावी, यासाठी प्रयत्न केले; मात्र त्यात यश न आल्याने अखेर त्यांना न्यायालयासमोर शरण यावे लागले.

जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आमदार राणे यांनी  मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता; मात्र तो मागे घेत २ फेब्रुवारी या दिवशी कणकवली येथील न्यायालयात शरण आले.

या वेळी न्यायालयाच्या बाहेर राणे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकही येथे सिद्ध ठेवले होते.

भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा नाेंद

१ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आमदार राणे घरी जाण्यास निघाले होते. त्या वेळी त्यांना अटक करण्यासाठी पोलीस गेले असता आमदार राणे यांचे बंधू माजी खासदार निलेश राणे आणि पोलीस यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. त्या वेळी राणे यांचे अधिवक्ता सतीश मानेशिंदे यांनी पोलिसांना सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाची आठवण करून देत आमदार राणे यांना १० दिवस अटक करू शकत नसल्याचे सांगितल्याने पोलीस माघारी फिरले आणि आमदार राणे घरी जाण्यासाठी मार्गस्थ झाले होते. मात्र या वेळी भाजपचे खासदार राणे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने २ फेब्रुवारी या दिवशी पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांचा लागू असलेला जमावबंदी आदेशाचा भंग करणे आणि पोलिसांशी वाद करणे, अशी कारणे देत या सर्वांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.