पक्षाचे मूळ सदस्य असलेले १४ उमेदवार आणि इतर पक्षांतून आयात केलेले २३ उमेदवार निवडून येण्याचा गोवा भाजपला विश्वास

पणजी –  विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे मूळ सदस्य असलेले १४ उमेदवार आणि इतर पक्षांतून आयात केलेले २३ उमेदवार निवडून येऊन सत्ता संपादन करणार असल्याचा विश्वास भाजपला वाटत आहे. भाजपने आगामी निवडणुकीत सर्व ४० मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. निवडणुकीत भाजपने त्याच्या मूळ १४ कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे.

भारतीय जनता पक्ष सोडून वर्ष २०१७ मध्ये ज्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि आता पुन्हा भाजपमध्ये आलेले अशा तिघांना उमेदवारी दिली आहे. तसेच इतर विविध पक्षांतून आयात केलेल्या २३ जणांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या उमेदवारांच्या सूचीत इतर पक्षांतून आयात केलेल्यांचा भरणा अधिक आहे. भाजपला या निवडणुकीत १० हून अधिक मतदारसंघांमध्ये उमेदवारी नाकारलेले नेते आणि कार्यकर्ते यांच्या बंडाला सामोरे जावे लागत आहे. मांद्रे येथून लक्ष्मीकांत पार्सेकर, शिवोली येथे मायकल लोबो यांची पत्नी डिलायला लोबो इत्यादी, तसेच साळगाव, प्रियोळ आणि फोंडा येथे मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विरोधात बंड पुकारले आहे.