काँग्रेसची सोयीस्कर देवनिष्ठा !

गोवा येथील काँग्रेस पक्षातील उमेदवार

५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा प्रचार जसजसा शिगेला पोचत आहे, तसतसे उमेदवारांच्या एका पक्षातून दुसर्‍या पक्षात प्रवेश करण्यासाठी उड्या पडत आहेत. याचा सर्वाधिक धसका काँग्रेस पक्षाने घेतला आहे. गेल्या निवडणुकीनंतर पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यानंतरही १० आमदारांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने या वेळी ‘निधर्मी’ विचारसरणी असलेल्या पक्षाला देवतांची आठवण होणे, हे आश्चर्यकारक आहे. काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीनंतर निवडून येऊन आमदारांनी पक्षांतर करू नये; म्हणून नुकत्याच त्यांच्या उमेदवारांना पणजीतील (गोवा) श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात शपथ दिली. मंदिरात ३६ जणांनी श्रीफळ ठेवून ‘आम्ही निवडून आल्यावर इतके-तिकडे कुठे न जाता काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षात काम करू. ‘पक्षाचा विकास होईल’, असे काम करू’, अशी शपथ घेतली. काँग्रेससाठी याहून लज्जास्पद आणि लाजिरवाणे ते काय ?

जो पक्ष आमदारांना एकत्र ठेवू शकत नाही आणि जे उमेदवार निवडून आल्यानंतर सत्तेसाठी पक्षांतर करतात, पक्षाशी एकनिष्ठ रहात नाहीत, १३० वर्षांहून अधिक वर्षे राज्य करणार्‍या त्या पक्षाची तत्त्वे कशी आहेत, हे लक्षात येते. तसेच उमेदवारही किती तत्त्वनिष्ठ आहेत, हे अधोरेखित होते. सतत हिंदूंच्या देवतांवर टीका करणे, ‘राम झालाच नाही. ते एक काल्पनिक पात्र होते’, असे सांगणार्‍या पक्षातील उमेदवारांच्या दृष्टीने देवीसमोर घेतलेली शपथ किती महत्त्वपूर्ण असणार ? राजकीय नेत्यांना बांधून ठेवण्यासाठी देवळात नेऊन देवीसमोर शपथ देणे, हे नाटक जनता जाणून आहे. काँग्रेसच्या उमेदवारांनी ‘देवतांचे विडंबन करणारे आम्हाला देवीसमोर शपथ का घ्यायला सांगत आहेत ?’ असा प्रश्न विचारून पक्षश्रेष्ठींना खडसावणे अपेक्षित आहे. राजकीय स्वार्थासाठी पक्ष कशा प्रकारे देवतांचा सोयीस्कर वापर करतात, त्याचेच हे उत्तम उदाहरण !

अनेक वर्षे सातत्याने हिंदु देवता, धर्म यांच्यावर यथेच्छ टीका करायची, मंदिर सरकारीकरणासारखे निर्णय घ्यायचे, प्रत्येक निवडणुकीत ‘निधर्मीत्व’ जपण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा, हिंदूंचा मानभंग होईल, तिथे तो करायचा अशा काँग्रेसला निवडणुकीत देवाची आठवण येणे, ही एक प्रकारे नियतीने दिलेली चपराकच आहे ! तत्त्वाला तिलांजली देणार्‍या काँग्रेसला जनतेने लक्षात ठेवून निवडणुकीत योग्य ती जागा दाखवायला हवी !

– श्री. अजय केळकर, कोल्हापूर