या अभियानामध्ये पुष्कळ कालावधीपासून प्रलंबित असलेल्या समस्या कुणामुळे राहिल्या त्यांनाही शिक्षा करावी, हीसुद्धा जनतेची अपेक्षा !
सांगली, ३० जानेवारी (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘महापौर आपल्या दारी’ हे अभियान चालू करण्यात येत आहे. ९ फेब्रुवारी या दिवशी महापालिकेचा वर्धापनदिन असून ७ फेब्रुवारीपासून मी प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहे, अशी माहिती सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापौर पुढे म्हणाले, ‘‘मी महापालिकेच्या २० प्रभागांत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहे. ७ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ४ वाजता कुपवाड येथून या अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या उपक्रमात महापालिकेचे सर्व पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, तसेच त्या त्या विभागाचे अधिकारी उपस्थित रहाणार आहेत. या अभियानात त्याच वेळी नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्याचा माझा मानस आहे.’’