दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील ‘झेड ब्लॅक’ या उदबत्तीच्या विज्ञापनातून राष्ट्रध्वजाचा अवमान !

समस्त हिंदु आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांच्याकडून पोलिसांत तक्रार प्रविष्ट

  • प्रजासत्ताकदिनानिमित्त राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’ हे राष्ट्रद्वेषीच ! – संपादक 
  • राष्ट्रध्वजाचा अवमान करणे, ही सध्या एक पद्धती झाली असून संबंधितांना तात्काळ कठोर शासन न केल्यानेच अशा घटना वारंवार घडत असतात ! – संपादक 

पुणे – दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या २५ जानेवारी २०२२ या दिवशीच्या दैनिकामध्ये पृष्ठ क्रमांक ५ वर ‘झेड ब्लॅक’ या उदबत्तीचे विज्ञापन प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या छायाचित्रामध्ये त्यांनी परिधान केलेल्या टी-शर्टवर राष्ट्रध्वजाचे ३ रंग उलट्या क्रमाने दाखवले आहेत. हे आक्षेपार्ह असून विज्ञापनाच्या माध्यमातून स्वतंत्र भारताचा अपमान करणारे आणि समस्त देशवासियांच्या भावना दुखावणारे दैनिक महाराष्ट्र टाइम्स, महेंद्रसिंह धोनी आणि ‘झेड ब्लॅक’ या आस्थापनाचे मालक, तसेच इतर संबंधित यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्याविषयी समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे
‘महाराष्ट्र टाइम्स’मधील ‘झेड ब्लॅक’ या उदबत्तीचे विज्ञापन

याविषयी मिलिंद एकबोटे म्हणाले, ‘‘भारतीय ध्वजसंहितेप्रमाणे संबंधित तिन्ही रंग एका विशिष्ट क्रमातच दाखवावे आणि वापरावे लागतात. ध्वजसंहितेचा भंग करणे, हा दखलपात्र गुन्हा आहे. हा भारतियांच्या भावना दुखावण्याचा हा अत्यंत अक्षम्य गुन्हा आहे. याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. महेंद्रसिंह धोनी यांच्या टी शर्टवर ‘इंडिया’ असा शब्द आहे. यावरून भारताचा अपमान करण्याचा विज्ञापन देणार्‍याचा हेतू स्पष्टपणे लक्षात येतो. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी.’’