तलवार आजही आमच्या हातात आहे हे लक्षात ठेवा !

  • संभाजीनगर येथे महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवण्यास ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील यांचा विरोध !

  • खासदार संजय राऊत यांची ‘एम्.आय.एम्.’ला चेतावणी

  • हिंदूंनो, राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला होणारा विरोध हा हिंदूंच्या शौर्याला विरोध आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक 
  • छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांनी मोगलांच्या विरोधात प्रखर लढा देऊन धर्मांधांना सळो कि पळो करून सोडले होते. हा इतिहास दडपण्यासाठी विरोध करणारे खासदार इम्तियाज जलील हे राष्ट्रद्रोहीच आहेत, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक 
डावीकडून खासदार संजय राऊत आणि ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील

संभाजीनगर – शहरातील कॅनॉट परिसरात तब्बल १ कोटी रुपये व्यय करून राष्ट्रपुरुष महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. शिवसेना आणि भाजप यांनी या पुतळ्यासाठी आग्रही मागणी केली असतांना दुसरीकडे ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील यांनी पुतळ्याला विरोध दर्शवला आहे. याविषयी पत्रकारांशी बोलतांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराणा प्रताप यांना ‘एम्.आय.एम्.’चा विरोध कशासाठी ? महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज हे या देशाचे शौर्य, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवाद यांचे प्रतीक आहेत. मोगल आणि आक्रमणकर्ते यांच्या विरोधात त्यांची तलवार चालली. त्यांनी हिंदूंचे रक्षण केले. हिंदु महिलांना संरक्षण दिले. मंदिरांचे रक्षण केले; म्हणून जर कुणी महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना विरोध करत असेल, तर त्यांची तलवार आजही आमच्या हातात आहे, हे लक्षात ठेवा, अशी चेतावणी त्यांनी एम्.आय.एम्.ला दिली आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी याच पैशांमधून ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणी यांसाठी सैनिकी शाळा चालू केली जावी, अशी मागणी केली आहे. (सैनिकी शाळांविषयी एवढा कळवळा आहे, तर इम्तियाज जलील यांनी स्वतःच्या खासदार निधीतून सैनिकी शाळांसाठी निधी द्यावा. – संपादक)


महाराणा प्रताप यांच्याविषयी बोलून इम्तियाज जलील वातावरण खराब करत आहेत ! – चंद्रकांत खैरे, माजी खासदार, शिवसेना

‘महाराणा प्रताप यांच्याविषयी बोलून खासदार इम्तियाज जलील वातावरण खराब करत आहेत. येणार्‍या निवडणुका लक्षात घेता असे वक्तव्य करून काहीतरी चर्चा करायची असे काम ते करत आहेत; मात्र महाराणा प्रताप हे महापुरुष होते. त्यांचा पुतळा संसदेतही आहे. त्यांच्यापासून वेगळी प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. त्यामुळे त्यांचा पुतळा उभारण्याची मागणी आमची आहे. जलील यांच्या वक्तव्यामुळे सर्व स्तरांतून त्यांचा निषेध केला जात आहे. देशातील विविध राज्यांत त्यांच्या विरोधात आंदोलन चालू होत आहे. त्यांचा विरोध कायम राहिला, तर शिवसेनाही रस्त्यावर उतरल्याविना रहाणार नाही’, अशी चेतावणी शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे, तर राजपूत संघटनांनी खासदार जलील यांच्या विरोधात आंदोलन करत आपला विरोध दर्शवला आहे.