पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २२ जानेवारी (वार्ता.) – वारकरी संप्रदाय पाईक संघाचे संस्थापक ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर, आर्ट ऑफ लिव्हिंग, तसेच महा एन्.जी.ओ. फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील चंद्रभागा माता मंदिराचा जिर्णोद्धार आणि परिसराचा विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ २० जानेवारी या दिवशी ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शेखर मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत परिचारक, समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज देहूकर, चोपडकर संस्थानचे प्रतिनिधी यांसह सर्व ज्येष्ठ फडकरी, दिंडी प्रमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
१. मागील काही वर्षांपासून चंद्रभागा मंदिराच्या शिखराची पडझड झाली होती, तसेच सभोवतालचा परिसर भकास झाला आहे. वारकर्यांसाठी नगरप्रदक्षिणा नियमातील हे महत्त्वाचे ठिकाण आहे; मात्र मंदिराच्या जीर्ण परिस्थितीमुळे भाविकांमधून याविषयी अप्रसन्नता व्यक्त होत असे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चैतन्य महाराज देहूकर यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी मान्यवरांची समायोचित भाषणे झाली.
२. येत्या ६ मासांमध्ये मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यात येणार असून परिसर स्वच्छ आणि पवित्र राखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वारकरी संप्रदाय पाईक संघ, आर्ट ऑफ लिव्हिंग, महा एन्.जी.ओ. फेडरेशनचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.