पाकमध्ये व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी तरुणीला फाशीची शिक्षा

भारतात प्रतिदिन विविध माध्यमांतून हिदु धर्म, देवता, श्रद्धास्थाने आदींचा अवमान केला जातो; मात्र याविरोधात साधी तक्रारही नोंदवण्यात येत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !

(प्रतिकात्मक चित्र)

रावळपिंडी (पाकिस्तान) – येथील न्यायालयाने एका महिलेला ईशनिंदेच्या (देवाचा अवमान केल्याच्या) प्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेल्या संदेशामध्ये या महिलेने महंमद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द वापरल्याचा तिच्यावर आरोप आहे. या प्रकरणी फारुख हसनत नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीवरून न्यायालयाने ही शिक्षा दिली आहे.

(सौजन्य : Hindustan Times)

दोषी अनिका अतीक हिने वर्ष २०२० मध्ये फारुखला व्हॉट्सअ‍ॅपवर संदेशामध्ये ईशनिंदेशी संबंधित काही गोष्टी पाठवल्या होत्या. यावर फारुख यांनी ‘हे संदेश तात्काळ पुसून टाक आणि क्षमा माग’, असे तिला म्हटले होते; मात्र तिने तसे करण्यास नकार दिला होता.

अनिकाने नकार दिल्यानंतर फारुखने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यावर अनिका अतीकला अटक करण्यात आली. फारुख हसनत आणि अनिका दोघेही एकेकाळी मित्र होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते आणि तिने रागाच्या भरात फारुखला व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह संदेश पाठवले होते.