छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचे पावित्र्य राखण्यासाठी भाजपकडून दक्षता समिती स्थापन !

  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचे संवर्धन करण्यासाठी भाजप कृती करत आहे, हे चांगलेच झाले. केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे दक्षता समितीने केंद्र सरकारकडे हे सूत्र लावून धरावे आणि पुरातत्व विभागाला गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी पावले उचलण्यास भाग पाडावे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! – संपादक

  • गड-दुर्गांकडे सर्व द्रुष्टीने दुर्लक्ष करणारे पुरातत्व विभागातील अधिकारी कठोर शिक्षेस पात्र आहेत ! – संपादक 
रायगड किल्ला

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांवर विशिष्ट धर्माची स्थाने उभारण्याचे प्रकार गेल्या २ वर्षांत चालू झाले असून गड-दुर्गांचे पावित्र्य नष्ट करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी भाजपच्या पदाधिकार्‍यांची दक्षता समिती स्थापन करत असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी १८ जानेवारी या दिवशी केली. या दक्षता समितीचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर आणि मार्गदर्शक म्हणून भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर असतील.

१. पाटील म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा राजकीय लाभासाठी सोयीने छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सांगण्याचा घातक प्रयत्न चालू झाला आहे. त्यातूनच राज्यातील विविध गड-दुर्गांवर विशिष्ट धर्माची स्थाने निर्माण करण्यात येत आहेत.

२. भाजपची ही समिती गडांना भेट देऊन गेल्या २ वर्षांत गडाचे पावित्र्य भंग करण्याचे कोणकोणते प्रयत्न झाले आहेत, याची नोंद करील आणि नंतर जनजागृती करून गडांचे पावित्र्य जपण्यासाठी संघर्ष करील.

३. या समितीत खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, माजी आमदार नितीनराजे शिंदे, भाजप सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप प्रदेश महिला मोर्चा चिटणीस वर्षा डहाळे याही सदस्य म्हणून काम पहातील.

इतिहासद्रोही पोलिसांवर कठोर कारवाई करा !

रायगडावरील अनधिकृत बांधकामाकडे खासदार संभाजीराजे यांनी लक्ष वेधले. शिवनेरी गडावर ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक सिद्दी इब्राहिम खान उद्यान’ असा फलक लावला गेला. रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावर ‘शिवाजी महाराजांचे गुरुवर्य पीरसाहेब यांच्या स्थानाकडे’ असा फलक झळकला. या प्रकारांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारी केल्या की, पोलीस ऐतिहासिक पुरावे मागतात आणि तक्रार घेत नाहीत. ऐतिहासिक गोष्टींचे सरसकट कागदोपत्री पुरावे मिळू शकत नाहीत, याचा लाभ उठवला जात आहे. (छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे कुणी पीरसाहेब होते, असे कुठल्या पुस्तकात लिहिले आहे ? जर धर्मांधांनी अशा प्रकारे तक्रार केली असती, तर पोलिसांनी पुरावे मागितले असते का ? – संपादक)