वर्धा – जिल्ह्यातील आर्वी येथील अवैध गर्भपात प्रकरणी पोलिसांनी कदम रुग्णालयातील आधुनिक वैद्या रेखा कदम यांचे पती आधुनिक वैद्य नीरज कदम यांना १५ जानेवारी या दिवशी अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणातील आरोपींची संख्या ६ झाली आहे. कदम रुग्णालयाच्या गर्भपात केंद्राचा परवाना हा आधुनिक वैद्या शैलेजा कदम यांच्या नावे आहे. त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी सूचनापत्र १२ जानेवारी या दिवशी दिले होते; मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना १४ जानेवारी या दिवशी नागपूर येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. १५ जानेवारीच्या सकाळपासूनच कदम रुग्णालय परिसरात डॉ. नीरज कदम यांना समवेत घेत पोलीस आणि आरोग्य विभागाचे पथक यांनी घराची झडती घेतली.
पोलिसांना कदम यांच्या घरात वन्य प्राण्यांची कातडी सापडली, तर आरोग्य विभागाच्या पथकाला शासकीय रुग्णालयातील औषधसाठा आणि इंजेक्शनही सापडली आहेत. हे साहित्य आरोग्य विभागाने जप्त केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आधुनिक वैद्य नीरज कदम हे आर्वी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते. त्यामुळे त्यांनी शासकीय रुग्णालयातील औषधसाठा, तसेच रुग्णालयात येणार्या रुग्णांना स्वतःच्या खासगी रुग्णालयात पाठवून स्वतःचा लाभ करून घेतला आहे का ?, अशी शंका उपस्थित केली जात आहे.