भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाले, तर अन्य १५ राष्ट्रे ‘हिंदु राष्ट्र’ होण्यास सिद्ध ! – पुरी पीठाचे  शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

कोलकाता – पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी पुन्हा एकदा हिंदु राष्ट्राचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, त्यांची ५२ देशांच्या वरिष्ठ प्रतिनिधींशी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’च्या माध्यमातून नुकतीच चर्चा झाली. त्यामध्ये ‘जर भारताने स्वत:ला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित केले, तर आम्हीही त्या दिशेने पाऊल टाकू’, असे मॉरिशस आणि भूतान यांच्यासह १५ देशांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट सांगितले आहे.

१. मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती राजयोगी स्नान करण्यासाठी गंगासागर मेळ्यामध्ये सहभागी झाले होते. शंकराचार्य यांनी एकमेव हिंदु राष्ट्र असलेल्या नेपाळविषयी म्हटले की, आता नेपाळ चीनचा बाहुला बनत चालला आहे. त्या दिशेने आमच्या विदेश धोरणामध्ये पालट होणे आवश्यक आहे.

२. बांगलादेशमधील हिंदु मंदिरे आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात येत असल्याविषयी शंकराचार्य यांनी अप्रसन्नता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘आम्ही हिंदु देवतांचा अपमान सहन करणार नाही. जर भारतात अल्पसंख्यांक आरामात रहात आहेत, तर बांगलादेशातील हिंदू सुखरूप का राहू शकत नाहीत ?’’