तामिळनाडूतील हिंदुद्वेषी द्रमुक सरकार हिंदूंच्या मंदिराच्या शेजारी हिंदूंच्याच मंदिरांच्या पैशांतून मासळी बाजार बांधणार !

हिंदु धर्माच्या मुळावर उठलेले द्रमुक सरकार ! तमिळनाडूमधील हिंदुद्वेषी कारवाया रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

चेन्नई – तामिळनाडू राज्यातील सत्ताधारी द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् म्हणजे द्रविड प्रगती संघ) सरकारच्या धर्मादाय विभागाने शहरात मासळी बाजार बांधण्याच्या प्रकल्पाला अनुमती दिली आहे. हा मासळी बाजार मंदिराच्या शेजारी बांधण्यात येणार असून त्यासाठी ३ वेगवेगळ्या मंदिरांकडून कर्ज घेण्यात येणार आहे.
सरकारकडून मासळी बाजार बांधण्याविषयी विधानसभेत घोषणा झाल्यावर धर्मादाय विभागाने त्याला प्रशासकीय अनुमती दिली. यासंदर्भात धर्मादाय विभागाने सादर केलेली कागदपत्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली आहेत. त्यात म्हटल्याप्रमाणे चेन्नई येथे जुने मासळी बाजार पाडून ‘आदि मोट्टाई’ मंदिराच्या शेजारी नवीन मासळी बाजार बांधण्यास संमती दिली आहे. याला १ कोटी ५० लाख रुपये व्यय होणार असून ते पैसे सुब्रह्मण्यम् स्वामी मंदिर, देवी करुमारी अम्मन मंदिर, कामाक्षी अम्मन आणि वैकुंठ पेरूमल या मंदिरांकडून कर्ज स्वरूपात घेतले जाणार आहे.

हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाजप यांच्याकडून विरोध

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाजप यांनी मंदिराच्या शेजारी मासळी बाजार बांधण्यास विरोध केला आहे. या माध्यमातून ‘मंदिराचे पावित्र्य भंग होणार असून धर्मादाय विभागाने मासळी बाजाराला मंदिराच्या शेजारी अनुमती देऊन हिंदूंच्या धर्मभावनांचा अपमानच केला आहे’, असे हिंदुत्वनिष्ठांनी म्हटले आहे. ‘द्रमुक सरकारची हिंदुद्वेषी मानसिकता पहाता या मासळी बाजारासाठी मंदिरांकडून कर्जस्वरूपात घेतलेले धन सरकार परत करील का’, याविषयी हिंदुत्वनिष्ठांनी शंका उपस्थित केली आहे.