पोलिसांच्या संरक्षणास अशी घटना घडत असेल, तर सर्वसामान्यांचे रक्षण कसे होईल ? भाजपच्या राज्यात अशी घटना आणि तिही भाजपच्या आमदाराच्या संदर्भात होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
उन्नाव (उत्तरप्रदेश) – येथे एका जाहीर सभेत भाजपचे आमदार पंकज गुप्ता यांना एका शेतकरी नेत्याने थप्पड लगावली आहे. २ दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. दुसरीकडे आमदार गुप्ता यांनी मात्र असा कोणताच प्रकार घडला नसल्याचा दावा केला आहे.
आमदार पंकज गुप्ता हे ५ जानेवारी या दिवशी माखीमधील ऐरा भदियार येथे एका कार्यक्रमाला उपस्थित असतांना एक व्यक्ती हातात लाठी घेऊन व्यासपिठावर पोचली आणि तिने थेट गुप्ता यांना थप्पड लगावली. पोलिसांनी या व्यक्तीला व्यासपिठावरून उतरवत स्थिती नियंत्रणात आणली. व्यासपिठावर पंकज गुप्ता यांच्यासमवेत खासदार साक्षी महाराज हेसुद्धा उपस्थित होते. थप्पड लगावणारी व्यक्ती शेतकरी नेता असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचे नाव छत्रपाल असल्याचेही सांगण्यात आले. त्यांनी हे पाऊल का उचलले, हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी शेतकर्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने त्यांचा उद्रेक झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. (सध्या कृषी कायद्याच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनात अनेक समाजविघातक घटक घुसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या घटनेची कसून चौकशी होणे आवश्यक ! – संपादक)