खासगी रुग्णालयांनी अनुमतीविना कोरोनाच्या रुग्णाला भरती करून नये – मनपा

मुंबई – सर्व खासगी रुग्णालयांनी कोरोनाच्या रुग्णाला भरती करण्यापूर्वी महापालिकेची अनुमती घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी जितक्या क्षमतेने रुग्णालयात खाटांची व्यवस्था होती, तेवढीच पुन्हा सक्रीय ठेवण्याचे निर्देश महापालिकेने सर्व रुग्णालयांना दिले आहेत. ५ जानेवारीला एकाच दिवसात कोरोनाचे १५ सहस्र रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

नवीन नियमावलीनुसार ज्या रुग्णांना याआधीच आजार आहे आणि त्यांना कोरोनाची लागण झाली असेल, तर त्यांना रुग्णालयात भरती करून घ्यावे. जर रुग्णालयात रुग्ण आधीच भरती असतील आणि खाटांची कमतरता भासत असेल, तर त्यांची परिस्थिती पाहून ३ दिवसांत त्यांना घरी सोडण्यात यावे.

रुग्णालयाने ८० टक्के कोरोनाच्या रुग्णांसाठीच्या खाटा उपलब्ध ठेवाव्या आणि अतिदक्षता विभाग १०० टक्के उघडावा. महापालिकेच्या अनुमतीविना कोणत्याही रुग्णाला या रुग्णखाटा देऊ नये. सर्व रुग्णालयांनी सरकारने निश्चित केलेले दर आकारावेत, असे महापालिकेने निर्देश दिले आहेत.