वृत्तवाहिन्यांमध्ये ‘सिंधुताई’ दुर्लक्षित !

पद्मश्री सिंधुताई सपकाळ

ज्येष्ठ समाजसेविका आणि ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त सिंधुताई सपकाळ आजारी असल्याने रुग्णालयात होत्या आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे हे वृत्त प्रसारित झाल्यावर जनतेला समजले; मात्र दुसरीकडे ‘कोणत्या कलाकारांना कोरोना झाला ?’, ‘कलाकारांचे कुणाशी प्रेमप्रकरण चालू आहे ?’, ‘कोणता अभिनेता कोणत्या अभिनेत्रीसह कुठे फिरायला जात आहे ?’, ‘अभिनेता सैफ अली खानचा मुलगा तैमूरचे काय चालू आहे ?’, ‘कोणत्या अभिनेत्याचा विवाह कुठे होणार आहे ?’, अशा स्वरूपाच्या बॉलीवूडशी निगडित बातम्यांचा भडिमार दर्शकांवर दिवसभर ‘ब्रेकिंग न्यूज’ (ताज्या बातम्या) म्हणून होत असतो.

प्रतिकात्मक छायाचित्र

‘लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ’ म्हणवणार्‍या वृत्तवाहिन्यांना बातम्यांचे प्राधान्य न समजणे किंवा कोणत्या बातमीला किती वेळ द्यावा, हे कळू नये, ही पत्रकारितेची शोकांतिका नव्हे का ? ज्या बातम्यांचा समाजाला उपयोग नाही, अशा बातम्या दाखवून समाजाचा घंटोन्घंटे वेळ घालवणे, हा वृत्तवाहिन्यांचा समाजद्रोहच म्हणावा लागेल. केवळ चौथी पर्यंत शिक्षण घेतलेल्या, निःस्वार्थीपणे कार्य केलेल्या, अनाथांचा आधारस्तंभ बनलेल्या आणि हिंदु संस्कृतीचे आयुष्यभर आचरण करणार्‍या ‘सिंधुताई’ समाजसेवेसाठी जगभरामध्ये आदर्श आहेत. अशा व्यक्तीमत्त्वाच्या जीवनाचा शेवट होत असतांना खरेतर त्यांचे संपूर्ण जीवनचरित्र दाखवणे अपेक्षित होते. असे न होता मृत्यू झाल्यानंतर वृत्तवाहिन्यांनी त्यांची बातमी दाखवणे, हे गंभीर आणि संतापजनक आहे.

येथे लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे जेव्हा वृत्तवाहिन्या त्यांच्या सामाजिक माध्यमांवर बॉलीवूडच्या बातम्या ठेवतात, तेव्हा त्या बातमी खाली स्वतःचे मत नोंदवून लोक तीव्र अप्रसन्नता व्यक्त करतात. असे असूनही बॉलीवूडच्या बातम्या देणे मात्र थांबवले जात नाही. याचा अर्थ ‘हे जाणीवपूर्वक केले जात आहे’, असे का म्हणू नये ? ‘तुम्हाला वाचायचे, तर वाचा. आम्हाला पाहिजे, तेच आम्ही करणार’, अशा पठडीतील हा वृत्तपत्रकारितेचा उद्दामपणा दिसतो. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने स्वतःचे दायित्व ओळखून वागावे, हीच अपेक्षा ! हिंदु राष्ट्रात समाजोपयोगी आदर्श पत्रकारिता असेल हे निश्चित !

– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.