सनातनचे ११४ वे संत पू. लक्ष्मण गोरेआजोबा (वय ८० वर्षे) यांच्या सन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती आणि त्यांच्यातील गुणांचे घडलेले दर्शन !

पू. लक्ष्मण गोरेआजोबा

१. पू. लक्ष्मण गोरेआजोबा चित्रीकरण कक्षात आल्यावर ‘त्यांची पातळी घोषित होणार आहे’, असा विचार मनात येणे, चित्रीकरण कक्षात शांतीची स्पंदने जाणवणे आणि ‘निर्विचार’ हा नामजप चालू होणे

‘मी ज्या वेळी चित्रीकरण कक्षात आले, त्यानंतर पाच मिनिटांनी पू. लक्ष्मण गोरेआजोबा यांना त्यांची नात कु. योगिनी आफळे (वय २० वर्षे) तेथे घेऊन आली. त्यांच्याकडे बघून ‘यांची आज पातळी घोषित होणार आहे’, असा विचार मनात आला. तेव्हा मला त्यांची पातळी किती आहे, हे ठाऊक नव्हते. चित्रीकरण कक्षात शांतीची स्पंदने जाणवत होती. माझे मन अंतर्मुख झाले अन् माझा ‘निर्विचार’ हा नामजप चालू झाला.

सौ. अंजली जोशी

२. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा श्रीकृष्णाचा चैतन्यमय नामजप उपस्थितांना ऐकवण्यात आल्यावर अंतर्यामी संपूर्ण निळा प्रकाश पसरणे आणि तो प्रकाश आकाशाच्या दिशेने जाणे

सूक्ष्मातील प्रयोगासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध करण्यात आलेला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा श्रीकृष्णाचा चैतन्यमय नामजप उपस्थितांना ऐकवण्यात आला. तेव्हा माझ्या अंतर्यामी संपूर्ण निळा प्रकाश पसरला होता. तो प्रकाश आकाशाच्या दिशेने वरवर जात असल्याचे दिसले. माझी निर्विचार अवस्था होती.

३. ‘लखोट्यातील छायाचित्राच्या सूक्ष्म प्रयोगाच्या वेळी ते छायाचित्र ‘श्री. लक्ष्मण गोरेकाका यांचे असावे’, असा विचार मनात येणे आणि ‘निर्विचार’ हा नामजप चालू होऊन शांत वाटणे

‘पांढर्‍या लखोट्याकडे पाहून काय जाणवते ?’, याविषयी प्रयोग घेण्यात आला. त्या वेळी त्या लखोट्यामध्ये ‘श्री. लक्ष्मण गोरेकाका यांचे छायाचित्र असावे’, असा विचार माझ्या मनात आला. मला सूक्ष्मातील काही कळत नाही. त्यामुळे मी प्रार्थना केली. तेव्हा बुद्धी आणि अंतर्मन यांनी ‘निर्विचार’, असा शब्द मनात घातला. त्या वेळी माझा ‘निर्विचार’ हा नामजप चालू झाला आणि मला शांत वाटू लागले.

४. भावप्रयोगाच्या वेळी डोळ्यांतून अश्रूधारा वहाणे आणि ‘माझा देह शुद्ध आणि पवित्र करा’, अशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना होणे अन् ‘हा सोहळा तपलोकात चालू आहे’, असे जाणवणे

त्यानंतर सुश्री (कु.) तेजलताईने भावप्रयोग चालू केला. तेव्हा पुष्कळ भावजागृती होत होती. माझ्या डोळ्यांतून अश्रूधारा वहात होत्या. भावप्रयोगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून आगमन झाल्याचे सांगितल्यावर त्यांच्या चरणांखाली मी माझे हात ठेवत होते. ‘माझा देह शुद्ध आणि पवित्र करा’, अशी माझ्याकडून त्यांना प्रार्थना होत होती. त्यांच्यामागे प.पू. अनंतानंद साईश आणि प.पू. भक्तराज महाराजही येतांना दिसत होते. ‘हा सोहळा तपलोकात चालू आहे’, असे मला जाणवत होते.

५. पू. गोरेआजोबांमधील बालकाप्रमाणे निरागसता आणि मनाची निर्मळता पाहून त्यांच्या चरणी वारंवार नतमस्तक व्हावेसे वाटणे

पू. गोरेकाकांचे हास्य पुष्कळ निर्मळ आहे. त्यांच्या डोळ्यांत आणि त्यांचे वागणे अन् बोलणे यांतून पुष्कळ निरागसता जाणवते. त्यांच्यामध्ये अहं अल्प आहे. ‘त्यांच्याकडे पाहून ते सतत बालकभावात आहेत’, असे मला जाणवत होते. ‘त्यांच्याकडे पहातच रहावे आणि त्यांच्या चरणी वारंवार नतमस्तक व्हावे’, असे मला वाटत होते.

६. पू. गोरेआजोबांच्या चरणांकडे पाहिल्यावर ते भगवान शिवासारखे निर्गुण दिसत होते.

७. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बोलतांना पू. गोरेआजोबांमध्ये क्षात्रतेज आणि ज्ञान यांचा संगम असल्याचे जाणवणे

त्यांनी सावरकरांविषयी सांगून ‘त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन राष्ट्र आणि समाज कार्य कसे केले ?’, हे सांगितले. तेव्हा ते ऐकतांना त्यांच्यात ‘क्षात्रतेज आणि ज्ञान यांचा संगम आहे’, असे मला जाणवले.

‘श्री गुरुमाऊलींच्या कृपेने मला हा संतसोहळा अनुभवण्यास मिळाला. याबद्दल श्रीकृष्ण आणि गुरुचरणी कोटीश: कृतज्ञता !’

– सौ. अंजली अजय जोशी, सनातन आश्रम, मिरज (७.१२.२०२१)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक