अमली पदार्थविरोधी पथक खंडणीसाठी खोटी प्रकरणे सिद्ध करत आहे ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांक विकासमंत्री

एका मुख्य अन्वेषण यंत्रणेवर मंत्र्यांनी आरोप करणे, हे गंभीर आहे. या प्रकरणातील सत्य जनतेपुढे यायला हवे ! – संपादक 

नवाब मलिक

मुंबई – वर्ष २०२१ मध्ये अमली पदार्थविरोधी पथकाचा मुंबईतील खोटारडेपणा उघड करण्याचे काम आम्ही केले आहे. प्रसिद्धीसाठी लोकांना बोलावले जायचे. खंडणीचा खेळ चालू होता. अमली पदार्थविरोधी पथक खंडणीसाठी खोटी प्रकरणे सिद्ध करत आहे, असा आरोप राज्याचे अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी २ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत केला.

या वेळी नवाब मलिक म्हणाले, ‘‘२ ऑक्टोबरच्या ‘क्रूज’वरील धाडीनंतर गोसावी, मनीष भानुशाली यांच्या प्रकरणात बनाव केला गेला. २५ कोटी रुपयांची देवघेव झाली. आम्ही सर्व पुरावे लोकांपुढे ठेवले. अमली पदार्थविरोधी पथकाने मात्र स्वत:ला वाचवण्यासाठी विशेष शोधपथक सिद्ध केले, तरीही त्यांचा खोटारडेपणा थांबलेला नाही. अमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांकडून बोगस खटले केले जात आहेत. कोर्‍या कागदावर स्वाक्षरी घेऊन लोकांना अडकवले जात आहे. खोट्या प्रकरणांना सुधारण्यासाठी पंचांना बोलावून पंचनाम्यात सुधारणा करण्यास सांगितले जात आहे.’’